जमावाने केलेल्या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना वाडा मनोर महामार्गावरील सापणे या गावच्या हद्दीत सोमवारी (दि.16) सायंकाळच्या सुमारास घडली. या मारहाणीत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

वाडा - एका ट्रक चालकाने महिलांची छेड काढल्याने व काही गाड्यांना कट मारल्याने संतापलेल्या नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून त्याला अडवून ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना वाडा मनोर महामार्गावरील सापणे या गावच्या हद्दीत सोमवारी (दि.16) सायंकाळच्या सुमारास घडली. या मारहाणीत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

हरेंद्रसिंग मदनसिंग (वय-48) असे ट्रक चालकाचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन, भिवंडी-वाडा-मनोर या महमार्गावरुन एमएच 12 केपी 4201 या क्रमांकाचा ट्रक (कंटेनर) मनोर च्या दिशेने जात असताना ट्रक चालकाने दुचाकीवरुन जात असलेल्या महिलांची छेड काढली एवढेच नव्हे तर काही गाड्यांना कट ही मारल्या. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सदर गाडीचा पाठलाग करून ट्रकला सापणे येथे अडविले. त्यानंतर संतप्त जमावाने त्याला ठोशे-बूक्के, विटांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याला गंभीर दुखापती झाल्या त्यातच त्याचा जागीच मृत्यु झाला.
       
या प्रकरणी आरोपी किरण भोईर, देवेंद्र पाटील, जयेश पाटिल यांना अटक केली असून आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302,341,34 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून गुह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश माळी करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Death of truck driver killed by mob