प्रभाग समित्यांवरूनही वाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

महापालिकेतील शहर सुधारणासह चारही विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सत्ताधारी भाजपने लांब ठेवल्यानंतर शिवसेनेनेही आता ताठर भूमिका घेण्यास सुरवात केली आहे.

पुणे - महापालिकेतील शहर सुधारणासह चारही विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सत्ताधारी भाजपने लांब ठेवल्यानंतर शिवसेनेनेही आता ताठर भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. भाजपच्या ताब्यात येणाऱ्या अकरापैकी चार प्रभाग समित्यांची मागणी करीत, भाजपची अडवणूक केली. मात्र, सभागृहातील तुटपुंज्या ताकदीची जाणीव करून, भाजपने या सर्वच जागांवर आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन होण्याची शक्‍यता फारच  धूसर झाली आहे. 

दरम्यान, येरवडा प्रभागात तीन नगरसेवक असल्याने प्रभाग समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ मिळण्याची शक्‍यता असतानाही शिवसेनेने मात्र आपला उमेदवार दिला नाही. महापालिकेत विषय समित्यांसह प्रभाग समित्यांसाठी निवडणूक होणार आहे, त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारी झाली. 

लोकसभा निवडणुकीआधी भाजप- शिवसेनेची युती असल्याने चारपैकी एक विषय समिती देण्याबाबत भाजप नेत्यांनी शिवसेनेशी चर्चा केली होती. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने युतीनंतरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील बेबनाव उघड झाला. विषय समित्यांचा वाद ताजा असतानाच प्रभाग समित्यांच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरूनही भाजप- शिवसेनेत मतभेद सुरू झाले आहेत. 

सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘‘शिवसेनेला एक समिती देता येणार होती, तशी चर्चा झाली; पण शिवसेनेने त्यांचा निर्णय कळवला नाही, त्यामुळे आमचे उमेदवार जाहीर करण्यात आले.’’

भाजपकडे ११ प्रभाग समित्या? 
महापालिकेच्या विषय समित्यांसह १५ प्रभाग समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने त्यासाठी निवडणूक होत आहे. सभागृहातील संख्याबळानुसार १५ पैकी ११ समित्या भाजप, तर तीन समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. एका प्रभाग समितीसाठी चिठ्ठी काढण्यात येईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी होती. ही प्रक्रिया झाली.

युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप शिवसेनेला स्थान देत नसल्याने या निवडणुकीतही उमेदवार दिला नाही
-संजय भोसले, शिवसेना गटनेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debate on Ward Committees in the municipal corporation