...तर कर्जदारांचा सत्कार का नको? - रघुनाथदादा पाटील

Raghunathdada-Patil
Raghunathdada-Patil

भवानीनगर - ‘या देशाला बुडवून पळून जाणाऱ्यांचा पंतप्रधान सत्कार करीत असतील तर कर्जाचा धिटाईने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार का नको?’ ही भूमिका मांडत शेतकरी संघटनेने चक्क ५ लाखांपासून ३० लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या ‘टॉप टेन’ थकबाकीदार शेतकऱ्यांचा दिवाळीनिमित्त येथे ‘गौरव’ केला.

भवानीनगर येथील पालखी तळ मैदानावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पंचायत झाली. यावेळी संघटनेचे नेते कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले, जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, ॲड. श्रीकांत करे, जनता दलाच्या वरिष्ठ नेत्या सुशीला मोराळे, रंजना नांदखिले, शुभांगी रायते आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात रघुनाथदादा पाटील यांनी सरकारसह विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले आहे. आज शेतीमालाला भाव नाही. दूध दर वाढू नये म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीतील मंडळी याचिका दाखल करून खोडा घालतात, सत्ताधारी त्याला साथ देतात. उसाच्या दराबाबतीतही याचिका दाखल होतात.

सत्ताधारी व विरोधक दोघेही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. शेतीपंपाच्या विजेबाबत सरकारने दिलेले अनुदान महावितरणने लाटले आहे, त्यामुळे वीजबिल भरा म्हणण्याची कोणती नैतिकता उरते? गायी जर १५ कोटी लिटर दूध देत असतील, तर प्रत्यक्षात दूध संघांमध्ये हा आकडा ६५ कोटी लिटरपर्यंत पोचतो. एवढे दूध अचानक तयार होतेच कसे? एवढी भेसळ होत असताना सरकार काय करते? आधीच्या व आताच्या सरकारने उसाचा दीड टक्का चोरला, हा जाणीवपूर्वक एफआरपी कमी करण्याचाच प्रकार आहे.’’

प्रास्ताविकात पांडुरंग रायते म्हणाले, ‘‘इंदापूर तालुका पाण्याने वेढला आहे, मात्र शेतकरी मागास आहेत. आमचे नेतेच तेवढे गब्बर झाले. ते नेते राहिलेच नाहीत, ते उद्योगपती बनले. आमचा शेतमाल स्वस्त राहावा एवढीच त्यांची कायमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या मागासपणाला तेच जबाबदार आहेत.’’

कर्जबाजारीपणा ही शेतकऱ्याची चूक नाही, ती सरकारच्या धोरणाची चूक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनो घाबरू नका, मोदी-मल्ल्यांसारखे तुम्ही काही पळून गेलेला नाहीत.
- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com