#PuneFlood डेक्‍कन, सिंहगड, इंद्रायणी आजही रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पाऊस आणि दरड कोसळल्याने सलग तिसऱ्या दिवशीही रेल्वेसेवा विस्कळित होती. मंगळवारी सर्व रेल्वेगाड्या रद्द केल्या, तर बुधवारी (ता.७) डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी इंद्रायणी एक्‍स्प्रेस धावणार नाहीत. 

पुणे - पाऊस आणि दरड कोसळल्याने सलग तिसऱ्या दिवशीही रेल्वेसेवा विस्कळित होती. मंगळवारी सर्व रेल्वेगाड्या रद्द केल्या, तर बुधवारी (ता.७) डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी इंद्रायणी एक्‍स्प्रेस धावणार नाहीत. 

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेगाड्या रद्द केल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. रेल्वे वाहतूक सलग तिसऱ्या दिवशी बंद ठेवल्याने हाल झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्‍त केली. दरम्यान, पुणे-एर्नाकुलम, सीएसएमटी-कोल्हापूर आणि मुंबई-चेन्नई एक्‍स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर या लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द केल्या आहेत. ‘‘लोणावळा ते कर्जत घाटातील लोहमार्गाचे काम रात्रं-दिवस सुरू आहे. ते लवकर पूर्ण होईल,’’ असे रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

रेल्वेसेवा विस्कळित आहे. त्यामुळे कल्याण ते लोणावळा बसने प्रवास करावा लागत आहे. लोणावळ्याहून लोकलने पुण्याला यावे लागत आहे. याचा प्रचंड मनस्ताप होत आहे, असे प्रवासी विजय नेवे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deccan express Sinhagad express Indrayani express canceled today