पुणे-सातारा रस्त्यासाठी डिसेंबरची डेडलाइन - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पुणे  - जागोजागी असलेल्या "डायव्हर्जन'मुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेला पुणे- सातारा रस्ता वाहनचालकांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत आला आहे. या रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. पण, आता हे काम पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण होईल, अशी पुन्हा नवीन "डेडलाइन' खुद्द केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. 

पुणे  - जागोजागी असलेल्या "डायव्हर्जन'मुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेला पुणे- सातारा रस्ता वाहनचालकांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत आला आहे. या रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. पण, आता हे काम पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण होईल, अशी पुन्हा नवीन "डेडलाइन' खुद्द केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. 

सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले, ""येत्या पाच डिसेंबरपर्यंत पुणे- सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम पूर्ण होईल, त्यासाठी पुण्यासह दिल्लीतदेखील सातत्याने बैठका घेतल्या आहेत. हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना अधिकार दिले आहेत.'' 

या रस्त्याचे काम कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने सुरू केले होते, त्यामुळे या कामाचे करार मोदी सरकारने केलेले नाहीत. त्यात अनेक गुंतागुंती होत्या. त्यातून या कामात प्रचंड अडचणी आल्या. त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या कामासाठी जमीन संपादनाचे काम आतापर्यंत सुरू होते, त्याला लोकांचा विरोध होता. आता हे सगळे प्रश्‍न सुटले आहेत. त्यामुळे येत्या 5 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे- सातारा रस्त्याची एकूण लांबी - 140.35 किमी 
काम पूर्ण झालेल्या रस्त्याची लांबी - 128.30 किमी 
काम अपूर्ण असलेल्या रस्त्याची लांबी - 12 किमी 
एकूण 62 पैकी पूर्ण झालेले स्ट्रक्‍चर - 47 
एकूण खर्च - 1725 कोटी रुपये 

चांदणी चौकातील कामाला गती 
अपघातात एका मुलीचे प्राण गेल्यानंतर अखेर चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला गती मिळत आहे. या प्रकल्पाबाबत माहिती देताना गडकरी म्हणाले, ""चांदणी चौकातील प्रकल्पाच्या निविदा निघाल्या आहेत. एकूण 14 हेक्‍टर जागा पुणे महापालिकेला संपादित करायची होती. त्यापैकी 5.5 हेक्‍टर जागा संपादित केली आहे. उर्वरित 8.5 हेक्‍टर जागा महापालिकेने संपादित करून द्यायची आहे. आम्ही नियम केला आहे, की 80 टक्के जागा संपादित केल्याशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची नाही. यात दोन उड्डाण पूल, एक ग्रेड सेपरेटर आणि एक ओव्हरपास आहे.''

Web Title: December deadline for Pune-Satara road says Nitin Gadkari