पुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण 

पुणे लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित- पृथ्वीराज चव्हाण 

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने लढायचे, हे अद्याप ठरलेले नाही, असे कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगितले. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या चार इच्छुकांची नावे निश्‍चित केल्यानंतर चव्हाण यांनी ही भूमिका मांडली. त्यात पुण्याची जागा ताब्यात घेण्याची राष्ट्रवादीची व्यूहरचना असल्याने कॉंग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ नेमका कोणाकडे जाणार, याची चर्चा आहे. 

आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय दोन्ही कॉंग्रेसने घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू असून, मतदारसंघनिहाय आढावा घेऊन वाटाघाटी करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही कॉंग्रेसमध्ये काही जागांबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार असल्याची घोषणा या पक्षाचे नेते अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवारही आहे, असेही पवार यांनी सांगितले होते. त्यावरून कॉंग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत, ही जागा सोडणार नसल्याचे राष्ट्रवादीला बजाविले होते. लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसमधून चारजण इच्छुक असून, त्यांची नावे दोनच दिवसांपूर्वी प्रदेश समितीकडे पाठविली आहेत. या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी पुण्याची जागा कोणत्या पक्षाने लढवायची, हे निश्‍चित झाले नसल्याचे सांगितले. दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होणार आहे. त्याबाबत आणखी बैठका होणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""शहरांची नावे बदलून धार्मिक मुद्दा पुढे आणत आहे. आपला पराभव भाजपला दिसत आहे.'' 

कऱ्हाडमधून विधानसभा लढणार 
पुण्यातून नव्हे तर मी कऱ्हाडमधून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणूक चव्हाण पुण्यातून लढणार असल्याची चर्चा होती. या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी हा खुलासा केला. या संदर्भातील चर्चेत तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, त्यातून परिस्थिती भाजपच्या हाताबाहेर गेली असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

"मनसे'ला सोबत घेणार नाही 
कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत समविचारी पक्षांना सोबत घेत आहोत. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि "एमआयएम'ला आमच्यासोबत घेणार नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. मनसेला एकत्र घेण्याबाबत मित्रपक्षांना काय भूमिका घ्यायची आहे त्यांनी घ्यावी, असा टोला चव्हाण यांनी राष्ट्रवादीला हाणला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com