"युती'चा निर्णय आज? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकांसाठी भाजपबरोबर युती करायची की नाही, याबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय राहणार, हे उद्या (सोमवार, ता.23) मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांची नजर या कार्यक्रमाकडे लागली आहे. 

पुणे - महापालिका निवडणुकांसाठी भाजपबरोबर युती करायची की नाही, याबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय राहणार, हे उद्या (सोमवार, ता.23) मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांची नजर या कार्यक्रमाकडे लागली आहे. 

महापालिका निवडणुकांसाठी मुंबईप्रमाणेच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे. चर्चेच्या फेऱ्या होऊनही युती होणार की नाही, याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये साशंकता आहे. "युती झालीच तर एकट्या मुंबई नव्हे; राज्यात होईल,' असे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुंबईत युती होण्याची सध्यातरी चिन्हे दिसत नसल्याने राज्यात अन्य ठिकाणी युती होण्याची शक्‍यता कमी असल्याचे बोलले जाते. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका मांडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यातून शिवसेनेची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याने या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले, तरच पुण्यातील युतीबाबत शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक होऊन चर्चा पुढे सरकेल; अन्यथा स्वबळाची तयारी केली आहे. ती अधिक जोमाने सुरू करावी लागणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

युती व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे; परंतु यापूर्वी भाजपच्या नेत्यांबरोबरच झालेल्या बैठकीत युतीसंदर्भात भाजप नेते "पॉझिटिव्ह' नसल्याचे दिसून आले आहे. याउपरही पक्षप्रमुख उद्या जी भूमिका स्पष्ट करतील, त्यानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल, असेही सांगण्यात आले. 

Web Title: The decision today BJP-SS