वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय - आयएमए

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पुणे - कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या प्रमुख मागणीसाठी निवासी डॉक्‍टरांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी बुधवारी संध्याकाळपासून अनिश्‍चित काळासाठी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने घेतला. पुण्यातही आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता डॉक्‍टर इतर कोणतेही रुग्ण तपासणार नाहीत, अशी भूमिका घेतली.

पुणे - कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या प्रमुख मागणीसाठी निवासी डॉक्‍टरांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी बुधवारी संध्याकाळपासून अनिश्‍चित काळासाठी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने घेतला. पुण्यातही आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता डॉक्‍टर इतर कोणतेही रुग्ण तपासणार नाहीत, अशी भूमिका घेतली.

राज्यातील चौदा वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्‍टर तीन दिवसांपासून सामूहिक रजेवर आहेत. अभ्यास करून, चांगले गुण मिळवून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात या निवासी डॉक्‍टरांना प्रवेश मिळाला आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांकडून त्यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत. अशा स्थितीत त्यांनी न्याय मागणीसाठी घेतलेल्या सामूहिक रजेला "आयएमए'ने पाठिंबा दिला आहे.

उच्च न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षेबाबतचे उपाय सांगितले आहेत. पण, याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे निवासी डॉक्‍टरांवरील हल्ले रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी "आयएमए'ने केली आहे. भयमुक्त वातावरणात काम करता यावे, असे वातावरण वैद्यकीय महाविद्यालयात असावे. त्यामुळे तेथील डॉक्‍टर, परिचारिका कोणत्याही दबावाशिवाय रुग्णसेवा करू शकतील. डॉक्‍टर आणि रुग्णालयांच्या संरक्षणासाठी 2010 मध्ये कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे.

या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत राज्यातील डॉक्‍टर वैद्यकीय सेवा बंद ठेवतील, असा निर्णय घेतल्याची माहिती "आयएमए'च्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी दिली. या निर्णयाला सर्व वैद्यकीय संघटनांचा पाठिंबा आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने म्हणजे आजपासून होईल. त्यामुळे बाह्य रुग्ण विभाग, प्रयोगशाळा तपासण्या तातडीने बंद करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

"आयएमए'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी म्हणाले, ""राज्य शाखेने घेतलेला निर्णय तातडीने शहरातील सर्व सदस्यांना कळविण्यात आला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी सुरू झाली. उद्या सकाळपासूनच सर्व बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात येतील.''

Web Title: decission to medical service close