पुण्यातील गुन्हेगारी घटली 

ब्रिजमोहन पाटील 
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोचा (एनसीआरबी) 2017 चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला असून, त्यानुसार 2017 मध्ये पुणे शहरात गुन्ह्यांची संख्या कमी होऊन वर्षभरात 19 हजार 172 गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट होत आहे.

पुणे - काही वर्षांपूर्वी पुण्यातील अट्टल गुन्हेगारांना मोका लावून कारागृहात डांबण्यात आल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोचा (एनसीआरबी) 2017 चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला असून, त्यानुसार 2017 मध्ये पुणे शहरात गुन्ह्यांची संख्या कमी होऊन वर्षभरात 19 हजार 172 गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट होत आहे. देशातील 19 मेट्रो शहरांमध्ये गुन्हेगारीत पुणे अकराव्या स्थानावरून बाराव्या क्रमांकावर आले आहे. 

"एनसीबीआर'तर्फे दरवर्षी देशातील गुन्हेगारीवर अहवाल प्रसिद्ध केला जातो. मात्र, 2017 चा अहवाल 2018 ऐवजी 2019 मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये देशातील गंभीर गुन्हे, फसवणूक, महिला अत्याचार, आर्थिक फसवणूक यासह इतर गुन्ह्यांचे विश्‍लेषण केले जाते. 

पुण्यात 2014 ते 16 या काळामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. टोळीयुद्धातून भररस्त्यात अनेकांचे खून झाले. त्याचप्रमाणे साखळीचोरी, जबरी चोरी, घरफोडी, महिला अत्याचार या गुन्ह्यांतही वाढ झाली होती. 2014 मध्ये पुण्यात 22 हजार 84 गुन्हे दाखल झाले होते. 2015 मध्ये त्यात घट होऊन 19 हजार 332 गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये यात वाढ होऊन 19 हजार 552 गुन्हे दाखल झाले. 

2017 मध्येही पुन्हा गुन्ह्यांची संख्या घटली असून, भारतीय दंड विधान (भादंवि) आणि इतर विशेष कायद्यांतर्गत 19 हजार 172 गुन्हे नोंदविले गेले आहेत. दिल्लीत तब्बल 2 लाख 24 हजार 346 गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीनंतर कोची, मुंबई, बेंगळूर, चैन्नई, सुरत, अहमदाबाद, जयपूर, कोलकता, लखनऊ, पटना या शहरांचा क्रमांक लागतो. पुणे शहर या यादीत 12व्या क्रमांकावर आहे. 

बलात्काराचे प्रमाण घटूनही पुणे पहिल्या पाच शहरांत 
पुणे महिलांसाठी सुरक्षित शहर असल्याचे "एनसीआरबी'च्या अहवालातून स्पष्ट होत आहे. 2016 मध्ये पुण्यात बलात्काराचे 354 गुन्हे दाखल झाले होते. पण, 2017 मध्ये 134 गुन्ह्यांची नोंद झाल्याने एका वर्षात 220 गुन्हे कमी झाले आहेत. परंतु, देशात सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे दाखल होणाऱ्या पहिल्या पाच शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. सर्वाधिक गुन्हे दिल्लीत (1168) नोंदले असून, त्यानंतर मुंबई (287 ), जयपूर (210), इंदूर (206) आणि पुण्याचा (134) क्रमांक लागतो. पुण्यात विनयभंगाचे 217 गुन्हे दाखल झाले असून, 2016 मध्ये 661 गुन्ह्यांची नोंद होती. 

खूनही घटले 
पुण्यात 2016 मध्ये 130 खून झाले होते. टोळीयुद्धातून अनेकांचा खून झाला होता. 2015-16 मध्ये पुण्यातील अनेक टोळ्यांच्या प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांवर मोकाची कारवाई करून त्यांना कारगृहात डांबण्यात आले होते. त्यामुळे 2017 मध्ये खुनाचे गुन्हे घटून 110 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात प्रामुख्याने वैयक्तिक व तत्कालीन कारणावरून रागाच्या भरात झालेले गुन्हे आहेत. खुनाच्या प्रयत्नाचे 163 गुन्हे आहेत. 

गुन्हेगारांवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांना लगाम बसला आहे. यापुढेही गुन्हेगारी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. सुरक्षित व निर्भय पुण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. 
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decline in crime in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: