पदविका प्रवेशाकडे कल कमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

बारावीनंतर करिअरच्या संधी प्रचंड आहेत. विविध क्षेत्रांची दारे खुली होतात. त्यामुळे पदविकेला तीन वर्षे घालविण्याची मानसिकता विद्यार्थी आणि पालकांची नाही. त्यामुळे प्रवेश घेणारांची संख्या कमी होत आहे.
- डॉ. दिलीप नंदनवार, सहसंचालक, तंत्र शिक्षण 

पुणे - दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल आता कमी होऊ लागला आहे. बारावीनंतर करिअरची असंख्य दरवाजे खुले होतात, तसेच पदविका पूर्ण करूनही रोजगार मिळण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पदविकेसाठी तीन वर्षे घालविण्याची विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मानसिकता राहिलेली नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मात्र, त्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी का पाठ फिरवू लागले आहेत, याबद्दल तज्ज्ञांकडे विचारणा केली असता, त्याबद्दल अनेक पैलू त्यांनी सांगितले. पदविका पूर्ण करूनही रोजगार मिळेलच, याची खात्री नसते. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळतो. पूर्वी पदवीच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. आता हे प्रमाण दहा टक्के केले आहे. त्याचाही परिणाम प्रवेश कमी होण्यावर झाला आहे.

वाणिज्य शाखेकडे ओढा आहे. त्यामुळे अकरावी, बारावी करून वाणिज्य शाखेचे अनेक अभ्यासक्रम विद्यार्थी करू शकतात. त्यांना रोजगार मिळण्याची खात्रीदेखील असते. याबरोबरच अभियांत्रिकी पदवी, वास्तुकला, विधी यांसारख्या असंख्य अभ्यासक्रमांकडे जाता येते. त्यामुळे पदविकेसाठी तीन वर्षे खर्च कशासाठी करायची, अशी पालकांची मानसिकता बनल्याचे मत तज्ज्ञ नोंदवितात. काही तज्ज्ञ प्रवेश कमी होण्यामागे सामाजिक कारणही असल्याचे सांगतात. पदविका घेऊन नोकरी केल्यास लग्न जमण्यातही अडचणी येतात. त्यामुळे थेट पदवी अभ्यासक्रमाला जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल असतो.

पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक भागातच पदविका अभ्यासक्रमांना मागणी असते. परंतु ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नाही. तेथे शासकीय तंत्रनिकेतने असूनही, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. शहरात प्रवेश मिळाला नाही, तर पूर्वी ग्रामीण भागातील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये विद्यार्थी जात असत. परंतु हे प्रमाण घटल्याचे तज्ज्ञ सांगतात.

राज्यातील जागा
१ लाख २० हजार पदविका
५६ हजार आतापर्यंतची प्रवेश नोंदणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in admission to Diploma Education