मानकर, कर्नाटकी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर व बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी फेटाळला. 

पुणे - जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर व बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी फेटाळला. 

रास्ता पेठ येथील समर्थ पोलिस ठाण्यासमोरील जमिनीच्या व्यवहारातून जितेंद्र जगताप यांनी घोरपडी येथे रेल्वेखाली उडी मारून शनिवारी (ता. 2) आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांच्यासोबत आलेल्या रिक्षाचालकाकडे फोटो आणि चिठ्ठी दिली होती. त्यात दीपक मानकर व सुधीर कर्नाटकी यांच्यासह सात जण आत्महत्येस जबाबदार असतील, असे नमूद केले होते. या संदर्भात जितेंद्र जगताप यांचा मुलगा जयेश जगताप (वय 23, रा. घोरपडे पेठ) याने लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मानकर व कर्नाटकी यांच्यासह सात जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार आणि विशांत कांबळे यांना अटक केली. त्यांना सात जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तपासादरम्यान, रास्ता पेठेतील कार्यालयात जितेंद्र जगताप यांनी स्वतः लिहिलेली आणखी एक चिठ्ठी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी (ता. 5) सुनावणी झाली. मानकर आणि कर्नाटकी यांना मयत जगताप हा पैशांसाठी ब्लॅकमेल करीत असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, सर्वोच्च न्यायालयात जागेसंदर्भात निकाल आमच्या बाजूने लागल्याचे नमूद केले. सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला. न्यायालयाने मानकर व कर्नाटकी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जासह अंतरिम जामीन फेटाळला. मानकर आणि कर्नाटकी यांच्या वतीने ऍड. सुधीर शहा आणि ऍड. ऋषिकेश गानू यांनी युक्तिवाद केला. 

Web Title: Deepak Mankar karnataki anticipatory bail denied