दीपक मानकर यांना मोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपक मानकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई झाली आहे. बुधवारी सकाळी मानकर लष्कर पोलिस ठाण्यात हजर झाले होते. दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस. ए. महात्मे यांनी दिला. 

पुणे - आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपक मानकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई झाली आहे. बुधवारी सकाळी मानकर लष्कर पोलिस ठाण्यात हजर झाले होते. दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस. ए. महात्मे यांनी दिला. 

घोरपडी येथे २ जून रोजी जितेंद्र जगताप यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. पोलिसांनी मानकर यांच्यासह इतरांविरुद्ध जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. मागील आठवड्यात मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत पुढील दहा दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मानकर आज लष्कर पोलिस ठाण्यात हजर झाले. जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा. जोशीवाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रेय सुतार (वय ३०, रा. जयभवानीनगर, कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा. मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६), विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, दोघेही रा. शांतिनगर, येरवडा), नाना कुदळे (रा. केळेवाडी) आणि अजय कंदारे (वय २७, रा. एरंडवणे) यांना अटक केली आहे. या प्रकरणात कर्नाटकी यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

जिल्हा मुख्य सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. मानकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदविला आहे. मानकर दहशतीच्या जोरावर जागेचा ताबा घेतात. ते टोळीचे प्रमुख असल्याने त्यांच्याविरुद्ध मोकानुसार कारवाई केली आहे. या गुन्ह्याच्या तपासाकरिता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. सुधीर शहा, ॲड. चिन्मय भोसले, ॲड. पुष्कर दुर्गे यांनी बाजू मांडली. मानकर यांच्याविरोधात मोकानुसार केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांचे वकील शहा यांनी केला. आत्तापर्यंत मानकर यांच्यावर दाखल १५ गुन्ह्यांमधील १४ गुन्ह्यांत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. एक गुन्हा उच्च न्यायालयात प्रलंबित असून, त्या गुन्ह्यातही त्यांचा काही सहभाग नाही. या गुन्ह्याशी संबंधित मूळ जमीनही मानकरांचीच असून मृत जगताप हे तेथे देखभाल करत होते. त्यामुळे या प्रकरणात ३०६ कलमही लागू होत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

Web Title: Deepak Mankar to Moka Pune land dealer suicide case