प्रदूषणाबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

आळंदी - प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करू शकत नसाल, तर तुम्ही महापालिका चालविण्यासाठी नालायक आहात. पिंपरी महापालिकेसह लोणावळा आणि तळेगाव  नगरपालिका हद्दीतूनही प्रक्रिया न करताच इंद्रायणीत सोडले जाणारे सांडपाणी तत्काळ न थांबल्यास गेली दोन वर्षांपासून कार्यरत असलेले अधिकारी आणि नगराध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असा आदेश देत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आळंदी - प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करू शकत नसाल, तर तुम्ही महापालिका चालविण्यासाठी नालायक आहात. पिंपरी महापालिकेसह लोणावळा आणि तळेगाव  नगरपालिका हद्दीतूनही प्रक्रिया न करताच इंद्रायणीत सोडले जाणारे सांडपाणी तत्काळ न थांबल्यास गेली दोन वर्षांपासून कार्यरत असलेले अधिकारी आणि नगराध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असा आदेश देत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कदम यांनी रविवारी (ता. १) येथील शासकीय विश्रामगृहात इंद्रायणी प्रदूषणाबाबत आणि एसटीपी प्लॅन्टबाबत आढावा घेतला. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, आमदार सुरेश गोरे, प्रदूषण नियंत्रण उपप्रादेशिक अधिकारी एच. डी. गंधे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे उपस्थित होते. गेली दहा वर्षांपासून आळंदीत येणाऱ्या लाखो भाविकांसह अनेक गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. आजपासून नदीपात्रात प्रदूषित पाणी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा आदेश त्यांनी दिला. 

सांडपाणी प्यायचे का?
दरम्यान, पिंपरी महापालिका हद्दीतून चौदा एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. जादाचा एसटीपी प्रकल्प पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल. पण, प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी दिली. त्यामुळे कदम संतप्त झाले. तुम्ही महापालिका चालविण्यास नालायक आहात. कारखान्यांवर कारवाई करण्यास तुमचे हात बांधलेत का? कारवाई करण्यात अडचण काय? लोकांनी तुमचे सांडपाणी प्यायचे का? अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. 
लोणावळा पालिका मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांडपाण्यासाठीचा निधी घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरल्याचे सांगितले. यावर कदम यांनी पालिकेला तत्काळ नोटीस काढण्यास सांगत नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. मुख्याधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली. तळेगाव दाभाडेचे मुख्याधिकारी  वैभव आवारे यांनी पालिका हद्दीतील सांडपाणी नदीत सोडले जात असून, एसटीपीसाठी जागा संपादित केली; मात्र सहा महिने वेळ लागल्याचे सांगितले. या वेळी कदम यांनी सध्या नदीत सोडले जाणारे सांडपाणी दुसरीकडे वळवा, असे सांगितले.

वारकऱ्यांसाठी शिथिलता
आषाढी वारीत पावसापासून संरक्षण करण्यासाठी वारकरी वापरत असलेल्या प्लॅस्टिकच्या कापडाच्या वापरावर बंदी नाही. त्याबाबत शिथिलता दिली असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.

मंत्रालयात उद्या बैठक
इंद्रायणीचे प्रदूषण करणाऱ्या पिंपरी महापालिका, लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहू ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (ता.३) मंत्रालयात ठेवण्यात आली आहे. 

Web Title: defective man crime against pollution