भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामीण पोलिस सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

देहू - ‘‘आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूत येणार आहेत. त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस सज्ज आहे. मात्र, पावसाळा असल्याने विजेशी निगडित कोणताही अपघात होऊ नये, यासाठी वीज वितरण कंपनीने या आठ दिवसांच्या काळात विशेष खबरदारी घ्यावी,’’ अशी सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी मंगळवारी (ता. २६) देहू येथे केल्या.

देहू - ‘‘आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूत येणार आहेत. त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस सज्ज आहे. मात्र, पावसाळा असल्याने विजेशी निगडित कोणताही अपघात होऊ नये, यासाठी वीज वितरण कंपनीने या आठ दिवसांच्या काळात विशेष खबरदारी घ्यावी,’’ अशी सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी मंगळवारी (ता. २६) देहू येथे केल्या.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या ५ जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची सुरक्षितता पुरविण्याबाबत तसेच पालखी मार्गावरील प्रवास सुखकर होण्यासाठी हक यांनी संत तुकाराम महाराज संस्थान, देहू ग्रामपंचायत, विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावली होती. त्या वेळी ते बोलत होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख अशोक मोरे, सुनील मोरे, विठ्ठल मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसीलदार गीतांजली शिर्के, देहूच्या सरपंच उषा चव्हाण, हवेली पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, पोलिस निरीक्षक प्रकाश धस, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्दे
पालखी प्रस्थानाच्या दिवशी देऊळवाड्यातील सभामंडपात एक हजार नागरिकांना पास देण्याची व्यवस्था.
ग्रामपंचायत प्रशासन सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीकर यंत्रणा बसविण्यास असमर्थ असल्याने पोलिस यंत्रणा स्वतःची वायरलेस यंत्रणा, स्पीकर सिस्टीम बसविणार. ही यंत्रणा सेंट्रलाइज असेल. 
देऊळवाड्याशेजारी धोकादायक अवस्थेतील इमारत पाडण्याच्या सूचना.
पालखी मार्गावर अन्नदान मंडळे आणि भाविकांच्या स्वागतासाठी मंडप टाकण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. 
पालखी सोहळ्यात रथाला बैलजोडी जुंपण्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या बैलाच्या मिरवणुकीस परवानगी नाही.
गावाबाहेरील नवीन रिंगरोडवर अवजड वाहनांसाठी पार्किंग सोय. 
आपत्कालीन व्यवस्थेसाठी जिल्हा परिषदेकडे क्रेनची मागणी. तसेच, इंद्रायणी नदीत कोणताही प्रकार घडल्यास यंत्रणा सज्ज.
अनगडशावली बाबा दर्ग्याजवळ खास व्यवस्था.
पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना. त्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरविणार.

ड्रोन कॅमेरे बसविण्याचा विचार आहे. मात्र, ते केवळ देऊळवाडी आणि परिसरात करणे शक्‍य आहे. ड्रोनचा प्रयोग करण्याचा विचार आहे. तसेच, निगडी प्राधिकरण येथील १७० स्वयंसेवक, एनसीसी, एनसीएसचे तीनशे विद्यार्थी आणि पाचशे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
- प्रकाश धस, पोलिस निरीक्षक, देहूरोड पोलिस ठाणे

Web Title: dehu news wari Rural police ready for the safety of the pilgrims