देहूरोडमध्ये हजारो अनुयायी नतमस्तक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

देहू - बौद्धबांधवांची पंढरी समजल्या जाणाऱ्या येथील ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा ६४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मंगळवारी साजरा करण्यात आला. देशातील विविध भागांतून आलेल्या हजारो बौद्धबांधवांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपाचे रांग लावून दर्शन घेतले. भीमगीतांनी अवघा परिसर दुमदुमला. 

देहू - बौद्धबांधवांची पंढरी समजल्या जाणाऱ्या येथील ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा ६४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मंगळवारी साजरा करण्यात आला. देशातील विविध भागांतून आलेल्या हजारो बौद्धबांधवांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपाचे रांग लावून दर्शन घेतले. भीमगीतांनी अवघा परिसर दुमदुमला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी येथील ऐतिहासिक धम्मभूमी, बुद्धविहारात गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करून धम्मक्रांती केली. या निमित्त देशातील हजारो बौद्धबांधव दरवर्षी मोठ्या संख्येने येथे येतात. विविध संस्था, संघटनांनी स्वागत कमानी उभारल्या होत्या.

विविध संघटनांचा पुढाकार
बुद्धविहार कृती समिती आणि धम्मभूमी सुरक्षा समितीच्या वतीने बुद्धवंदना, धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी उत्तमराव सावंत यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण झाले. प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना प्रबुद्ध साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. ॲड. बी. जी. बनसोडे यांना न्यायरत्न, जी. एस. कांबळे यांना क्रांतिरत्न, सुदामराव पवार, सुधाकर खांबे, शरद उपरवट भीमरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. राजाराम आसवरे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. धम्मभूमीचे अनुवर्तक सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर कवी संमेलन झाले. समितीचे अध्यक्ष टेक्‍सास गायकवाड, बोर्डाचे सदस्य गोपाळराव तंतरपाळे, धर्मपाल तंतरपाळे, अशोक गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, किरण आल्हाट, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, विजय पवार व इतर उपस्थित होते.

भीमगीतांनी परिसर दुमदुमला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांनी परिसर दुमदुमला. विविध संस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बुद्धविहार ट्रस्ट, रिपब्लिकन पक्ष आठवले गट, युवा गट देहूरोड, मावळ प्रबोधिनी, भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन समाज पक्ष यांनी विविध कार्यक्रमांचे आणि अन्नदानाचे आयोजन केले होते. 

वाहतूक व्यवस्थेत बदल
देहूरोड ते निगडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती. कात्रज बाह्यवळण महामार्ग ते रावेत मार्गे भक्तीशक्ती निगडीकडे वाहनांना प्रवेश देण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रकाश धस, अमरनाथ वाघमोडे, वाहतूक शाखेचे सतीश पवार, सुनील हगवणे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

मारुतीराव किर्ते यांचे अनोखे अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानापासून देहूरोड येथील बौद्ध विहारापर्यंतची एकूण १६ हजार ४७८ पाऊले मोजण्याची कामगिरी निगडीमधील ६९ वर्षीय आंबेडकरअनुयायी मारुती गणपतराव किर्ते यांनी नुकतीच केली. आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या पायरीपासून त्यांनी दुपारी १२.३५ वाजता चालण्यास सुरवात केली. पाऊले मोजताना किर्ते हे सायंकाळी ५.३० वाजता देहूरोडच्या बुद्ध विहाराजवळ पोचले. त्यांनी तेथे जाऊन डॉ.आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

Web Title: Dehuroad Dhammabhumi Anniversary