देहूरोड पूल रविवारपासून खुला - बाळा भेगडे

Dehuroad-Flyover
Dehuroad-Flyover

देहू - पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निगडी ते देहूरोड दरम्यान चौपदरीकरण करण्यात आले आहे. तसेच नव्याने उभारलेल्या उड्डाण पुलाचे कामही पूर्ण झाले असून, त्याचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते रविवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आमदार बाळा भेगडे यांनी सोमवारी दिली.

भेगडे म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांपासून निगडी ते देहूरोड दरम्यान अरुंद महामार्गामुळे अनेक अपघात झाले. त्यात अनेकांनी प्राण गमावले. महामार्गाच्या रुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठी सरकारने ९० कोटींचा निधी दिला. त्यातून हे काम पूर्ण झाले आहे. येत्या रविवारी या पुलाचे उद्‌घाटन होईल. बोर्डाच्या हद्दीत साडेचार वर्षांत सुमारे शंभर कोटींची विकासकामे झाली. यात सव्वा सहा किलोमीटरचा रस्त्याचे चौपदरीकरण आणि दीड किलोमीटरचा उड्डाण पुलाचा समावेश आहे. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. राज्य सरकार दरवर्षी पाच कोटी रुपये राज्यातील कॅंटोन्मेंट बोर्डाला विकासासाठी देणार आहे. या वर्षी सिद्धिविनायकनगरी, श्रीविहार, दत्तनगर परिसरात बोर्डाच्या मालकीच्या पाणी योजना पाच कोटींच्या निधीतून सुरू करणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परीक्षण करण्यासाठी बोर्डाने दहा लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे या भागाचा तसेच चिंचोली, झेंडेमळा, किन्हई गावाचा पाणीप्रश्‍न सुटेल. पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मशानभूमीसाठी एक कोटी ६७ लाख रुपये निधी दिला आहे. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. शेलारवाडी येथील स्मशानभूमी, थॉमस कॉलनी रस्ते, चिंचोली येथील समाजमंदिराच्या निधी उपलब्ध करून दिला आहे. 

विशाल खंडेलवाल म्हणाले, ‘‘बोर्डाच्या हद्दीत अनेक विकासकामे झाली आहेत. महापालिकेने स्मशानभूमीसाठी दिलेल्या एक कोटी ६७ लाख निधीतून शवविद्युत दाहिनी बसविण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन याच दिवशी होणार आहे. तसेच नवीन शाळा बांधकाम प्रस्ताव, सोळा कोटींचे अद्ययावत रुग्णालयाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे.’’

या वेळी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, सदस्य विशाल खंडेलवाल, ॲड. अरुणा पिंजण, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, भाजपचे शहराध्यक्ष ॲड. कैलास पानसरे, गुरुमितसिंग रत्तू, बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते.

आमदार भेगडे म्हणाले....
  सातही वॉर्डातील विकासासाठी प्रत्येक सदस्याला ५० लाखांचा निधी
  सिमेंटचे रस्ते, भूमिगत गटारांची कामे सुरू
  शेलारवाडीत शेतकऱ्यांना अडीच किलोमीटरचा रस्ता
  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न सुरू
  पालखीमार्गाच्या कामासाठी लष्कराकडून जागा मिळण्यासाठी प्रयत्न
  बुद्धविहार, धम्मभूमीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर
  प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामही मंजुरीसाठी संरक्षण विभागाकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com