पुणे पेठांमधील रस्त्यांची कामे लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Road Work

पुणे महापालिकेच्या पथ विभागाने रस्ते डांबरीकरण करण्यासाठी काढलेली ६३ कोटी रुपयांची चौथ्या टप्प्यातील (पॅकेज फोर) निविदा राजकीय दबावामुळे रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती.

Pune Road Work : पुणे पेठांमधील रस्त्यांची कामे लांबणीवर

पुणे - पुणे महापालिकेच्या पथ विभागाने रस्ते डांबरीकरण करण्यासाठी काढलेली ६३ कोटी रुपयांची चौथ्या टप्प्यातील (पॅकेज फोर) निविदा राजकीय दबावामुळे रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. या टप्प्यातील बहुतांश रस्ते हे कसबा विधानसभा मतदारसंघातील आहेत. पण सध्या तेथे पोटनिवडणूक सुरू असल्याने ही निविदा आचारसंहितेत अडकली आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्ते दुरुस्तीला आणखी विलंब होणार आहे.

शहरात पाणी पुरवठा योजना, मलःनिसारण वाहिनी, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी, मोबाईल केबल टाकणे यामुळे अनेक रस्ते वारंवार खोदण्यात आल्याने मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील रस्त्यांना खड्डे पडले. त्यावर सिमेंट किंवा डांबर टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण हे पॅचवर्क चुकीच्या पद्धतीने केल्याने वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

त्यातच जानेवारी २०२३ मध्ये ‘जी २०’ परिषद होणार असल्याने शहरातील रस्ते चांगले करण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले जातील असे सांगण्यात आले. पण सुमारे ३५० कोटी रुपये खर्च करून रस्ते डांबरीकरण केले जात आहेत. तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या टप्प्यातील निविदांमध्ये वाद झाला नाही. पण चौथ्या टप्प्प्यातील निविदेत अटी व शर्ती बदलल्याने वाद निर्माण झाला.

यामध्ये राजकीय दबाव आणून निविदा मंजूर करून घेतली जात होती. यामध्ये दोन माजी सभागृहनेते, दोन आमदार, काही नगरसेवकांचा समावेश होता. या वादात ६३ कोटीची निविदा रद्द करण्यात आली होती. प्रशासकीय सुधारणा करून पुन्हा एकदा निविदा काढली जाणार होती. पण या निविदेत बहुतांश रस्ते हे कसबा विधानसभा मतदारसंघातील आहेत. तेथे पोटनिवडणूक सुरू असल्याने आचारसंहितेमुळे निविदा काढता येणार नसल्याने हे काम ठप्प झाले आहे. ही प्रक्रिया आता चार मार्च नंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘रस्ते डांबरीकरण करण्याच्या चार क्रमांकाच्या निविदेत बहुतांश रस्ते हे कसबा मतदारसंघातील आहेत. तेथे आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक झाल्यानंतर तेथील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.