शैक्षणिक नुकसानीला जबाबदार शिक्षकांवर कारवाईची मागणी

Aundh.jpg
Aundh.jpg

पुणे (औंध) : औंध येथील इंग्रजी माध्यमाच्या स्पायसर शाळेत मागील काही दिवसांपूर्वी गटबाजी करत चाळीस शिक्षकांनी अचानक संप केल्यानंतरही शाळेतील व्यवस्थापनाने काहीच कारवाई केली नाही. उलट उपप्राचार्य प्रशांत शिरसाट यांना निलंबीत करून त्यांचा बळी दिल्याच्या विरोधात पालकांनी एकत्र येत आज व्यवस्थापनाला जाब विचारला.तसेच संप करणाऱया शिक्षकांवर का कारवाई केली नाही ? याबद्दलही विचारणा केली.

जवळपास तीनशे पालकांनी व्यवस्थापन व प्राचार्यांच्या अनागोंदी कारभारात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असा आरोप केला. शाळेतील नववीच्या विद्यार्थीनीला एका शिक्षकाने मारहाण केली होती. ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने उपप्राचार्य शिरसाट यांनी संबंधीत शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केली. यामुळे 190 पैकी 40 शिक्षकांचा एक वेगळा गट करून शिरसाट यांच्या विरोधात संप करण्यात आला. परंतु याची संस्थेला व पालकांना कुठलीही अधिकृत माहिती न देता संप केला गेला. हा वाद चिघळत गेल्यानंतर शेवटी पालकांनी आज व्यवस्थापनासोबत चर्चा केली असता वेगळीच कारणे पुढे येत गेली.

संप करणाऱ्या शिक्षकांना कुठलाही त्रास नसतांना त्यांनी केलेला संप अनधिकृत तर होताच परंतु या प्रकरणी संपकरी शिक्षकांना  व्यवस्थापनाने पाठीशी घालून स्वच्छ प्रतिमा असलेल्या उपप्राचार्यांचा मात्र बळी दिल्याचा आरोप पालकांनी केला. विशेष म्हणजे संप कालावधीत ज्या शिक्षकांनी शाळा चालवली त्यांनीही व्यवस्थापन व त्या चाळीस शिक्षकांविरोधात भूमिका घेतली व व्यवस्थापनाकडून संपकरी शिक्षकाविरोधातील तक्रारीची कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास आणले. यावेळी पालकांनी कुलगुरू व प्राचार्य डाॅ. संजीवन अरसुद यांना धारेवर धरत सत्य बाब निदर्शनास आणून शैक्षणिक नुकसान करणाऱया शिक्षकांवर लगेचच कारवाई करा , अशी मागणी केली. यावेळी संप करणारे शिक्षक मात्र अनुपस्थित राहिल्याने पालकांनी गोंधळ घालत ''त्या शिक्षकावर खरोखरच अन्याय झाला असेल तर आपली भूमिका मांडावी'' , अशी मागणी केली. या सर्व गदारोळात प्राचार्य डाॅ. अरसुद यांनी मात्र कुठलीच समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्याविरोधात पालकांनी घोषणाबाजी करत धारेवर धरले. गेले काही दिवस शाळेत अभ्यासक्रम वेळेत पुर्ण न केल्यानेही पालकांनी जाब विचारला यावर लवकरात लवकर अभ्यासक्रम पुर्ण करण्याचे आश्वासन प्राचार्यांनी दिले. परंतु यावर कुणाचेच समाधान झाले नाही. याविषयी प्राचार्य डाॅ.अरसुद यांच्याशी प्रतिक्रीया घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले.

''आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच त्याचबरोबर काही गोष्टी चुकीच्या घडत असतांनाही व्यवस्थापन मात्र चुकीच्या बाजूला समर्थन देत आहे.याविरोधात आज आम्ही पालकांनी भेट घेऊन त्या चाळीस शिक्षकांना समोर आणून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्या संपकरी शिक्षकांचाच खोटारडेपणा उघड झाला.आमच्या मुलांच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या  या शिक्षकांवर व्यवस्थापनाने  कडक कारवाई करावी''
- जगदिश माने, पालक

''मी नियमानुसार माझी भूमिका पार पाडूनही व्यवस्थापनाने मला पद सोडण्याचे सांगितले.परंतु या प्रकरणातील त्या शिक्षकांना कुठेच असुरक्षितपणा वाटेल असे काहीही मी केले नाही.फक्त वाद होऊ नयेत यासाठी शिस्तभंगाची कारवाई केली परंतु व्यवस्थापनाने  निलंबनाची चुकीची कारवाई करून माझ्यावरच अन्याय केला''
- प्रशांत शिरसाट, उपप्राचार्य स्पायसर शाळा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com