ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली मोठी मागणी

shugarcane
shugarcane

माळेगाव (पुणे) : "साहेब, हातातोंडाशी आलेले सोयाबीन, आलं, भाजीपाल्याची पिकं पावसाने घालवली आहेत. आता पावसाने चांगली उघडीप दिल्याने ऊस गाळायला साखर कारखान्यांना लवकर परवानगी द्या, म्हणजे आम्हाला मोकळ्या रानात थंडीचा हंगाम विचारात घेऊन गहू, हरभऱ्याचे पीक घेता येईल,' अशी मागणी माळेगाव व सोमेश्‍वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने वर्षानुवर्षे नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात उसाचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू करतात. त्यामुळे थंडीच्या कालावधीत मोकळ्या शिवारात शेतकऱ्यांना गहू व हरभऱ्याचे पीक घेणे शक्‍य होते. परंतु, यंदा अतिपावसाच्या तडाख्यामुळे साखर आयुक्तांनी 1 डिसेंबरपासून कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे या जाहीर केले आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बहुतांशी ठिकाणी वाफसा येऊ लागला असतानाही कारखाना सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मागील वर्षी दुष्काळीस्थिती होती. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात उसाची टंचाई लक्षणीय आहे. परिणामी उसाची पळवापळवी होऊ शकते. आयुक्तांचा निर्णय खासगी कारखानदारांना पोषक असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. 

कारखाने उशिरा सुरू होत असल्याने गाळपास आलेले उसाचे क्षेत्र वेळेत मोकळे होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याची पिके घेणे शक्‍य होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे ज्या कारखान्यांची ऊस तोडणीसाठी भौगोलिक परिस्थिती पोषक आहे, अशा कारखान्यांना तातडीने गाळपास परवानगी द्यावी, अशी आग्रह मागणी अनिल तावरे, राजेंद्र जाधव, प्रकाश सातव, विलास सस्ते, अशोकराव तावरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. 

राष्ट्रपती राजवटीचा फटका! 
राज्य सरकार अस्तित्वात न आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरू झाली. परिणामी मंत्री समिती स्थापन न झाल्याने साखर आयुक्तांना साखर उद्योगाच्या धोरणावर ठोस निर्णय घेताना मर्यादा येत आहे. या प्रतिकूल स्थितीतून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम शेतकऱ्यांच्या मागणीनुसार किमान 20 नोव्हेंबरला तरी सुरू व्हावा, असा तगादा साखर आयुक्तांकडे लावला आहे. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com