"कार्ड स्वॅप मशिन'ची मागणी वाढली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलनी नोटांच्या तुटवड्यावर "एटीएम- डेबिट आणि क्रेडिट'कार्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे व्यावसायिकांकडूनही या कार्डच्या वापरासाठी "कार्ड स्वॅप मशिन'ची मागणी बॅंकांकडे होऊ लागली आहे. 

पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलनी नोटांच्या तुटवड्यावर "एटीएम- डेबिट आणि क्रेडिट'कार्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे व्यावसायिकांकडूनही या कार्डच्या वापरासाठी "कार्ड स्वॅप मशिन'ची मागणी बॅंकांकडे होऊ लागली आहे. 

चलनी नोटांऐवजी "कार्ड'च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणारा एक ठराविक वर्गच होता. कार्ड असूनही रोखीने व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. परंतु, गेल्या आठवड्यापासून चलनांचा तुटवडा निर्माण झाला असून पाचशे आणि हजार रुपयांची नोट कोणीही सहज स्वीकारत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी तसे फलकही दुकानात लावले आहेत. त्याचा परिणाम "कार्ड'च्या वापरावर झाला आहे. 

हॉटेल व्यावसायिक गणेश शेट्टी म्हणाले, ""शहरांतील उत्तम दर्जाच्या हॉटेलमध्ये "कार्ड'च्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याची यंत्रणा आहे. "कार्ड'द्वारे होणाऱ्या "पेमेंट'मध्ये तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.'' 

व्यावसायिक पराग शहा म्हणाले, की "कार्ड स्वॅप मशिन' खुल्या बाजारात मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिक, व्यापाऱ्यांना त्यांचे खाते असलेल्या बॅंकेतूनच ते मिळवावे लागते. यापूर्वी औषध विक्रेते, स्टेशनरी, कापड व्यावसायिक, सराफ आदींकडे ही सेवा उपलब्ध होतीच. पण, चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रोखीने व्यवहार होत नाही, उधारी देणे परवडत नाही, अशा व्यावसायिकांनीही बॅंकांकडे "कार्ड स्वॅप मशिन'ची सेवा सुरू करण्याची मागणी करत आहेत. 

सुवर्णयुग सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष राहुल चव्हाण म्हणाले, ""व्यावसायिक, ग्राहक या दोन्ही घटकांच्यादृष्टीने "कार्ड पेमेंट' ही सुलभ गोष्ट आहे. कार्ड स्वॅप पद्धतीत ग्राहकाच्या खात्यातून थेट पैसे विक्रेत्याच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे दोघांनाही प्रत्यक्षात चलन सांभाळत बसण्याची गरज राहत नाही. गेल्या आठवड्याभरात कार्ड मशिनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. चलन तुटवड्यामुळे या पद्धतीने पैसे हस्तांतरणाचे महत्त्व नागरिकांना समजेल आणि पुढील काळात याचप्रकारे आर्थिक व्यवहार करण्यास ते पसंती देतील.''

Web Title: Demand card swap machine

टॅग्स