डवरी गोसावी समाजाला जातीचे दाखल व रेशन कार्ड देण्याची मागणी

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 1 जुलै 2018

नागपंथी डवरी गोसावी समाजाला जातीचे दाखले देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागपंथी डवरी गोसावी युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

भिगवण - नागपंथी डवरी गोसावी समाजाला जातीचे दाखले, घरकुल व रेशन कार्ड मिळण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. जातीचे दाखले व रेशन कार्ड नसल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील असुनही समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. नागपंथी डवरी गोसावी समाजाला जातीचे दाखले देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागपंथी डवरी गोसावी युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत नागपंथी डवरी गोसावी युवा संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष विलास शिंदे व पदाधिकाऱ्यांनी इंदापुरचे तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. नागपंथी डवरी समाज हा उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्यभर भटकंती करत असतो. यामधील काही कुटुंबे ही मागील पंचवीस वर्षापासुन इंदापुर तालुक्यामध्ये रहिवासी आहेत. जातीचे दाखले काढण्यासाठी १९६१ पुर्वीचे पुरावे शासनाकडुन मागण्यात येत आहेत. समाज भटकंती करत असल्यामुळे याबाबत कागदोपत्री पुरावे उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे जातीचे दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत. काही लोकांकडे रेशनकार्ड आहे. परंतु धान्य मिळत नाही, जागा असुनही घरकुलाचा लाभ मिळत नाही अशी समाजाची अवस्था आहे. जातीचे दाखले काढण्यासाठी १९६१ पुर्वीचा पुरावा नाही, जातीच्या दाखल्या अभावी मुलांना शिक्षणासाठी व पुढे नोकऱ्यासाठी अडचणी येत आहेत. शासनाच्या वतीने नागपंथी डवरी गोसावी समाजाला जातीचे दाखले, घरकुल आदी योजनांचा लाभ द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Demand for caste registration and ration card for Davri Gosavi community

टॅग्स