दोषारोपपत्रासाठी हवी मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए) दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) वकिलांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए. सय्यद यांच्याकडे गुरुवारी केली. त्यावर उद्या (ता. 16) सुनावणी होणार आहे. 

डॉ. दाभोलकर यांच्यावर अंदुरे, कळसकर यांनी गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे, असा युक्तिवाद सीबीआयचे वकील पी. राजू यांनी केला. या प्रकरणातील अटक आरोपी वीरेंद्र तावडे यांचे काही ई-मेल मिळाले असून, फरारी असलेला आरोपी सारंग अकोलकर याच्याशी त्याने संवाद केल्याचे स्पष्ट झाले आहे. गौरी लंकेश प्रकरणात एसआयटीने अटक केलेल्या अमोल काळेकडे एक डायरी मिळाली असून, त्यामध्ये 36 जणांची नावे आहेत. त्यांना मारण्याचा कट होता. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांची हत्या केली. काळेच्या डायरीमध्ये ज्या 36 लोकांची नावे आहेत, त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. आरोपींनी मोठा कट रचला असून तो एका दिवसात नाही तर त्यासाठी त्यांनी भरपूर पूर्वतयारी केली आहे, त्यामुळे प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी नव्वद दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी ऍड. राजू यांनी केली. 

आरोपी अंदुरेतर्फे बाजू मांडताना ऍड. संजीव पुनाळेकर म्हणाले, की दाभोलकर हत्या प्रकरणात विनय पवार आणि सारंग अकोलकर मारेकरी असल्याचे सीबीआयने सुरवातीला सांगितले. अंदुरे तीन महिने आधीच अटक असून, त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत. आणखी 90 दिवस त्याला अटकेत ठेवणे त्याच्यावर अन्याय आहे. 

कळसकरची बाजू आज मांडणार 
कळसकर याला मुंबईतील मध्यवर्ती कारागृहातून "व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्याला न्यायाधीशांनी सुनावणीची माहिती दिली. कळसकरचे वकील ऍड. धर्मचारी चंडेल शुक्रवारी बाजू मांडणार आहेत. 

Web Title: Demand for the charge sheet in dr narendra dabholkar case