येमेन येथून हाफकिनच्या जीवरक्षक औषधांना मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पश्चिम आशिया मधील 'येमेन' देशातून हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या विविध जीवरक्षक औषधांना मागणी प्राप्त झाली आहे. ही जीवरक्षक औषधे तयार असून येमेनला त्यांचा पुरवठा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. 

पिंपरी-चिंचवड : पश्चिम आशिया मधील 'येमेन' देशातून हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या विविध जीवरक्षक औषधांना मागणी प्राप्त झाली आहे. ही जीवरक्षक औषधे तयार असून येमेनला त्यांचा पुरवठा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. 

हाफकिन महामंडळ हे देशातील प्रतिविष, रक्तजल आणि सर्पदंश प्रतिरोधक औषधे उत्पादन करणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेचे पिंपरी येथे मोठे उत्पादन केंद्र आहे. या संस्थेत १ हजार घोडे आणि अश्ववर्गीय प्राण्यांच्या सहाय्याने सर्पदंश, विंचूदंश, श्वानदंश प्रतिविष तसेच प्रतिधनुर्वात लसी तयार केल्या जातात. 

या औषधांच्या उत्पादन निर्मिती बद्दल माहिती घेण्यासाठी 'येमेन'च्या प्रतिनिधी मंडळाने संस्थेच्या पिंपरी विभागाला भेट दिली. येथे उत्पादित औषधे 'येमेन'ला उपयुक्त ठरू शकतात. अशी खात्री पटल्यावर त्यांनी हाफकिन महामंडळाला विविध जीवरक्षक औषधांचा पुरवठा करण्याची मागणी नोंदविली. 

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशासाठी ३ हजार कुप्या,  विंचूदंशावरील १ हजार, श्वानदंशाच्या ५ हजार तर प्रतिधनुर्वात लसींच्या १० हजार कुप्यांची मागणी महामंडळाला आली आहे. त्यांच्या पुरवठ्याची कार्यवाही चालू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Haffkines antibiotics from Yemen