वनौषधींच्या रोपांना मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पिंपरी - महापालिकेच्या भोसरी आणि चिंचवड एमआयडीसीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानांमध्ये वनौषधींच्या रोपांना नागरिकांकडून चांगली मागणी आहे. महापालिकेच्या अन्य उद्यानांमध्येही याचा वापर होत आहे. 

पिंपरी - महापालिकेच्या भोसरी आणि चिंचवड एमआयडीसीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानांमध्ये वनौषधींच्या रोपांना नागरिकांकडून चांगली मागणी आहे. महापालिकेच्या अन्य उद्यानांमध्येही याचा वापर होत आहे. 

भोसरी एमआयडीसीतील एफ टू ब्लॉक आणि चिंचवड एमआयडीसीतील डी.-टू. ब्लॉकमध्ये अशी महापालिकेची दोन आयुर्वेदिक वनौषधी उद्याने आहेत. भोसरी येथील उद्यान १९९७ मध्ये सुरू झाले. सुरवातीला सुमारे ४८० झाडे होती. सध्या सुमारे ८०० झाडे आहेत. त्यामध्ये हिरडा, बेहडा, अडुळसा, पाणफुटी, अर्जुन, अमरकंद, एरंड अशा वनस्पतींचा समावेश आहे. दर आठवड्याला विविध महाविद्यालयांमधील वनस्पतीशास्त्राचे सुमारे १५० विद्यार्थी येथे भेट देतात. या उद्यानात त्यांना प्रत्यक्ष रोपे बघायला मिळतात. या उद्यानातील रोपे दहा ते २० रुपयांना विकली जातात. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

उद्यानात साठलेल्या पाल्यापाचोळ्यापासून गांडूळ खतही तयार केले जाते. त्याचा वापर येथील झाडांसाठीच केला जातो. येथील झाडांना पाणी घालण्यासाठी कूपनलिकेची व महापालिकेच्या नळजोडाची व्यवस्था आहे. परंतु कूपनलिकेस केवळ २० मिनिटेच पाणी असते. त्यामुळे झाडांना कसेबसे पाणी मिळते. त्यामुळे तेथील उद्यानाची देखभाल करणाऱ्यांना तारेवरची कसरत करीत देखभालीचे काम करावे लागते. झाडांना पाणी देण्यासाठी महापालिकेच्या वतीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून झाडे मोठी झाल्याचे कारण देत टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

चिंचवड येथील उद्यान 
सुमारे दोन एकर जागेवर विस्तारलेले आहे. येथेही  ३०० हून अधिक आयुर्वेदिक झाडे आहेत. परंतु, उद्यानाचे प्रवेशद्वार खूपच लहान आहे. तसेच आजूबाजूने कंपन्यांची वाहने उभी असतात. या उद्यानाच्या नावाची पाटीही नाही. त्यामुळे येथे उद्यान आहे की नाही, हेच लवकर कळत नाही.

एफ-टू ब्लॉकमधील उद्यानातील झाडे मोठी झाली आहेत. त्याला पाण्याची फारशी गरज नाही. चिंचवडमधील उद्यानाचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. 
- सुरेश साळुंके, मुख्य उद्यान अधीक्षक, महापालिका

एमआयडीसीने येथे आयुर्वेदिक उद्यानाचा फलक लावावा. जेणेकरून स्थानिक नागरिकांना या वनौषधींची माहिती होईल. तसेच वनस्पतीशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा उपयोग होईल. 
- अमित तलाठी, नागरिक, चिंचवड

Web Title: Demand for herbs