राडारोडा व कचरा हटवण्याची मनसेची मागणी

बाबा तारे
रविवार, 22 एप्रिल 2018

कामगार आयुक्त कार्यालयासमोरील पदपथाच्या कामाचा राडारोडा तसाच आहे. हा राडारोडा लवकरात लवकर हटवावा, अशी मागणी मनसेच्या वतीने शिवाजी नगर अध्यक्ष सुहास निम्हण यांनी घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.

पुणे (औंध) - पुणे मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोरील पदपथाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने पदपथाच्या कामाचा राडारोडा तसाच आहे. हा राडारोडा लवकरात लवकर हटवावा, अशी मागणी मनसेच्या वतीने शिवाजी नगर अध्यक्ष सुहास निम्हण यांनी घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. या राडारोड्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत, तो कचरा व राडारोडा रस्त्यावरच इकडे तिकडे पसरत आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. येथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. तसेच शेजारच्या परिसरात कचऱ्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे व डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.

सध्या पुण्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू या सारख्या आजारांची साथ सुरु आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, परिसरातील नागरिक थंडी, तापाने ग्रासले आहेत. त्यामुळे विद्यार्थी सतत गैरहजर असतात परीक्षांचे दिवस असून विद्यार्थी गैरहजर राहिल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. याची तक्रार पालक व नागरिक मनसेच्या कार्यालयात करत आहेत. तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या 15 दिवसाच्या आत सर्व कचरा, राडारोडा उचलावा व पदपथाचे काम त्वरित करावे. आणि पंधरा दिवसात जर हे काम झाले नाही तर हा राडारोडा मनसेतर्फे उचलून क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात आणून टाकून मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल. अशा प्रकारचे निवेदन सुहास निम्हण यांनी मनसेच्या वतीने घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The demand of the MNS to remove garbage