परराज्यातील बटाटा खातो भाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात उत्तर प्रदेशातील आग्रा व गुजरात राज्यातून शीतगृहात साठविलेल्या बटाट्याची आठवड्याला पन्नास ट्रकवर आवक होत आहे.

चाकण (पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात उत्तर प्रदेशातील आग्रा व गुजरात राज्यातून शीतगृहात साठविलेल्या बटाट्याची आठवड्याला पन्नास ट्रकवर आवक होत आहे.

स्थानिक बटाट्याची आवक अजिबात नाही. गुजरात बटाट्याला चौदा ते पंधरा रुपये तर आग्रा बटाट्याला सोळा ते एकोणीस रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर यांनी दिली. पावसाने स्थानिक पावसाळी बटाटा काढणी योग्य झाला नाही.

पावसामुळे बटाटा कुजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना अत्यल्प प्रमाणात हा बटाटा हाती लागला. सध्या स्थानिक बटाट्याची आवक बाजारात काहीच होत नाही. स्थानिक भागात नव्याने हिवाळी बटाट्याची लागवड होत आहे. हा बटाटा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात काढणीस येणार आहे. सध्या बाजारात परराज्यातील बटाटा विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे सध्या तरी ग्राहकांना परराज्यातील साठवणूक केलेल्या बटाट्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Potato From Other Sates