बाप रे, बारशाच्या कार्यक्रमातील पुजारी निघाला कोरोनाबाधित...

विलास काटे
सोमवार, 13 जुलै 2020

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे मित्र आणि नातेवाईकांना होमक्वारंटाइन करण्याबाबत प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्यानेच चित्र आहे.

आळंदी (पुणे) : आळंदी येथील गोपाळपुरा येथे राहणाऱ्या एका पुजाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसर कंटेनमेंट जाहिर केला. संबंधित पुजाऱ्यासोबतचे इतर पुजारी मात्र होम क्वारंटनाइन केले नाहीत. त्यामुळे ते मोकाटपणे शहरात फिरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे मित्र आणि नातेवाईकांना होमक्वारंटाइन करण्याबाबत प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्यानेच चित्र आहे. प्रतिबंधित क्षेत्र असूनही मोकाट फिरणारे आणि लॉकाडाउन जाहिर झाल्यानंतरही अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त इतर उघड्या दुकानदारांवर कारवाईची मागणी आळंदीकरांकडून केली जात आहे.

आणखी वाचा - पुण्याच चहा पेक्षा किटली गरम, पोलिसांनी अडवले रस्ते

गोपाळपुरा येथील कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला पुजारी औरंगाबाद येथून आला होता. त्यानंतर एका बारशाच्या कार्यक्रमात पाच ते सात पुजाऱ्यांसोबत त्याने मंत्रोच्चारही केला. त्यानंतर लगेचच पुजाऱ्याची कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रशासनाला समजल्यानंतर संबंधित पुजारी राहत असलेला भाग प्रतिबंधित केला. पुजाऱ्यासोबतचे इतर पुजारी मात्र आपल्याला काही झाले नाही, अशा थाटात संपूर्ण गावात फिरत आहेत. आळंदीत आजपर्यंत कोरोनाचे 29 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एक महिला मृत पावली असून, सहाजण बरे होऊन घरी परतले आणि उर्वरित 22 जण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी अत्यावश्यक दुकाने वगळता इतरांना बंदी केली होती. मात्र, तरीही आळंदीत गिफ्ट हाउस, खेळणीची दुकाने, हॉटेल व्यावसायिक, प्रसाद, बुट, चप्पल विक्रेते दुकाने उघडे ठेवून व्यवसाय करत होते. आळंदी पालिकेकडून निव्वळ रिक्षा फिरवून दवंडी केली जाते. मात्र, कारवाई केली जात नाही. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पालिकेकडून आता मोकाट फिरणारे आणि चोरून व्यापार करणारांवर कारवाईची मागणी होत आहे.

आणखी वाचा - पुणेकरांनो उद्या दुकानं खुली राहणार...पण

दरम्यान, आळंदी मुख्याधिकारी अंकुश जाधव हे नव्याने आळंदीत मुख्याधिकारीपदाचा पदाभार घेतल्याने बदलीच्या ठिकाणाहून वस्तू आणण्यासाठी गावी गेले. तर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र चौधर आणि प्रशाक जाधव कोरोनाग्रस्त असल्याने उपचार घेत आहेत. 

आळंदीलगतच्या चऱ्होली, केळगाव, चोविसावाडी, मरकळ, सोळू या गावातील रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. मात्र, तरीही या भागातील अनेक नागरिक बिनकामाचे फिरताना दिसत आहे. यामध्ये काही राजकिय व्यक्ती असून, काही असेच आळंदीत काय चाललंय, हे पाहण्यासाठी येतात. मंदिर परिसरात काही व्यापारी पुण्याहून आळंदीत येत आहे. अशा लोकांवरही कारवाईची मागणी केली जात आहे. 
 
Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for quarantine of persons in contact with Corona patient in Alandi