अामचे जागीच पुनर्वसन करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

 पुण्यातील कामगार पुतळा वसाहतितील नागरिकांची मागणी

पुणे : कामगार पुतळा वसाहत येथील मेट्रोबाधितांचे जागीच पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कामगार पुतळा झोपडपट्टी बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात झोपडपट्टीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

पुणे : कामगार पुतळा वसाहत येथील मेट्रोबाधितांचे जागीच पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कामगार पुतळा झोपडपट्टी बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात झोपडपट्टीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

कामगार पुतळा झोपडपट्टी ही अधिकृत झोपडपट्टी म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली आहे. तसेच, या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्तावही मंजूर आहे. मात्र, गेल्या 12 वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेंगाळला आहे. दरम्यान, झोपडपट्टीतून मेट्रो मार्ग जात असल्याने त्यामध्ये आणखी भर पडली आहे. झोपडीधारकांचे पुनर्वसन जागीच होणार की नाही, याबाबत महामेट्रो, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही दाद दिली जात नाही. गेल्या बारा वर्षांपासून विकास होणार, या आशेवर येथील नागरिकांना अत्यंत वाईट परिस्थितीत राहावे लागत आहे. 

दरम्यान, मेट्रोमार्गासाठी आवश्‍यक जागा देऊनही ती शिल्लक राहते. त्यामुळे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन होणे सहजशक्‍य आहे. मात्र, संपूर्ण झोपडपट्टीच हलविण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला. 
आंदोलनावेळी मेट्रोमार्ग नदीपात्रातून काढावा किंवा पिलरपुरती जागा घ्यावी व शिल्लक जागेत पुनर्वसन करावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आले. मेट्रोला विरोध नाही. मात्र, विकास होत असताना झोपडपट्टी पुनर्वसनालाही प्राधान्य द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for rehabilitation on the spot