
Baramati News : बारामतीतील रेल्वे मालधक्का शहराबाहेर हलविण्याची मागणी...
बारामती - शहरातील भिगवण रस्त्यालगत असलेला रेल्वेचा मालधक्का शहराबाहेर हलवावा या मागणीचा फारसा विचारच होत नसल्याचे समोर येत आहे. बारामती फलटण नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रीया सुरु आहे. या मध्ये नेपतवळण नजिक रेल्वे स्थानक अस्तित्वात येणार आहे. कटफळवरुन नेपतवळणच्या बाजूला लोहमार्ग टाकला जाणार आहे.
या नवीन रेल्वे भूसंपादन प्रक्रीया व लोहमार्ग टाकण्याच्य कामासोबतच बारामती शहराच्या मध्यवर्ती भागातील रेल्वे मालधक्का देखील शहराबाहेर हलविण्याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा, अशी लोकांची मागणी आहे.
बारामतीच्या रेल्वेच्या मैदानावर दररोज उभे असलेले ट्रक शहराच्या वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. सर्व अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरुन वळविली असली तरी रेल्वे मालधक्क्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गच नसल्याने नाइलाजाने भिगवण रस्त्याचाच वापर ट्रकचालकांना करावा लागत आहे.
या रस्त्यावर आजवर अनेकांचा बळी गेला, अपघातात अनेक जायबंदी झाले, मात्र हा मालधक्का काही शहराबाहेर जात नाही. किमान पन्नासहून अधिक ट्रक दैनंदिन रेल्वे मैदानावर उभे असतात. नजिकच्या म.ए.सो. विद्यालय व विद्या प्रतिष्ठानच्या शाळांमधील विद्यार्थी व भिगवण रस्त्याने सुरु असलेली दुचाकींची मोठी वाहतूक या पार्श्वभूमीवर ट्रकची वाहतूक कायमच धोकादायक ठरत आलेली आहे.
काही वर्षांपूर्वी रेल्वे मालधक्का अस्तित्वात आला तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आता शहराचा पसारा वाढल्याने हा रेल्वे मालधक्का शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आला असल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.
तांत्रिक बिघाड, चालकांचा बेफिकीरपणा किंवा इतर काही कारणांमुळे ट्रकचा अपघात झाल्यास नागरिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागते, त्या मुळे हा मालधक्का लवकरात लवकर शहराबाहेर हलविणे गरजेचे आहे अशी नागरिकांची भावना आहे. नवीन रेल्वे मार्गाची रचना करताना मालधक्क्याच्या दृष्टीनेही रेल्वेने नियोजन करावे अशी मागणी आहे.