परिपूर्ण विकासासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची मागणी

मिलिंद संगई
रविवार, 5 ऑगस्ट 2018

बारामती नगरपालिकेतील गटबाजीचे राजकारण संपून विकासाच्या दिशेने सर्व नगरसेवकांसह प्रशासनाने हातात हात घालून पुढे जायला हवे, अशी बारामतीकरांची प्रामाणिक इच्छा आहे. गटबाजी आणि कुरघोड्यांच्या राजकारणासाठी नव्हे तर विकासाभिमुख नगरी म्हणून बारामतीची ओळख राज्य व देशाला नव्याने करुन देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. 

बारामती नगरपालिकेतील गटबाजीचे राजकारण संपून विकासाच्या दिशेने सर्व नगरसेवकांसह प्रशासनाने हातात हात घालून पुढे जायला हवे, अशी बारामतीकरांची प्रामाणिक इच्छा आहे. गटबाजी आणि कुरघोड्यांच्या राजकारणासाठी नव्हे तर विकासाभिमुख नगरी म्हणून बारामतीची ओळख राज्य व देशाला नव्याने करुन देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. 

गेल्या काही वर्षात बारामती नगरपालिका म्हटले की निव्वळ राजकारण, मानापमान नाट्य, परस्परांना शह प्रतिशह देण्याचे विविध मार्गांनी होणारे प्रयत्न, सातत्याने होणारे वादविवाद व गटातटाचे राजकारण हिच प्रतिमा डोळ्यासमोर येते. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व असलेली ही नगरी विकासासाठी देशात मॉडेल म्हणून ओळखली जात असली तरी नगरपालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या काही दिवसात नगरपालिकेचा आलेख उतरता असल्याचे दिसत आहे. सत्ता गेल्यापासून निधीची चणचण आणि परस्पर समन्वयाच्या अभावाने कमी कालावधीत अधिक विकासकामे पूर्ण करण्यात आलेले अपयश अशा बाजूच समोर आल्या. 

वास्तविक बारामती आखीव रेखीव नगरी आहे. रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि इतरही बाबतीत राज्यातील इतर शहरांपेक्षा कमालीचे उजवे शहर म्हणता येईल. मात्र नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या समन्वयाच्या अभावाने अनेक योजना वेळेत मार्गी लागत नाहीत तर काही योजना रखडतात. ही बाब विचारात घेत अजित पवार यांनी पार्टी मिटींग घेत कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सातत्याने केला, मात्र त्यातही काही जणांचे राजकारण अजूनही तसेच सुरु आहे. 

बारामतीचा विकास झाला, मात्र या शहराच्या विकासापेक्षा राजकारणाच्याच बातम्या अधिक आल्याने प्रतिमेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. स्वच्छ सर्वेक्षणात समन्वयाच्या अभावाने शहराचा नामोल्लेखही कोठे झाला नाही. करण्यासारखी अनेक कामे असताना व कर्तृत्व सिध्द करण्याची संधी असतानाही नगरसेवकातील राजकारणच ठळकपणे समोर येते ही बाब बदलण्याची आता गरज निर्माण झाली आहे. 

दोन तीन नगरसेवकांचा अपवाद वगळता नवीन चेह-यांना अजित पवार यांनी संधी देताना त्यांच्याकडून उत्साहाने कामे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र नव्या जुन्यांचा समन्वय साधून सर्वांवर काही ना काही जबाबदारी सोपवून त्यांनाही काम करण्याची संधी देणे गरजेचे असताना तसे काही घडले नाही. ठराविक लोकांच्या हातातच सगळी सूत्रे एकवटल्याने त्याचा परिणाम जाणवू लागला. गटांच्या राजकारणाचा फटका प्रशासनाची कार्यक्षमतेवरही दिसला. सर्वांना विश्वासात घेत विकासाचे समान सूत्र राबविण्यापेक्षाही इगो सांभाळण्यातच अधिक शक्ती खर्ची पडताना दिसत आहे. 

झाले गेले सगळेच विसरुन सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी व प्रशासनाने एकत्र येत मानापमान दूर सारुन शहर विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत विकासाच्या योजना पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करावा अशी बारामतीकरांची अपेक्षा आहे. सर्वांगसुंदर शहर अधिक सुरेख कसे होईल व या नगरीचा नावलौकीक सर्व स्तरांवर अधिक कसा वाढेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आता गरज आहे. नगरपालिकेतील राजकारणाला बारामतीकरही कंटाळले असून आता नगरसेवकांनी गिअर बदलण्याची आवश्यकता लोकच बोलून दाखवित आहेत. 

ज्येष्ठांनी पुढाकार घेत समन्वय साधण्यासाठी वडीलकीच्या नात्याने पुढाकार घेत सर्वांना एकत्र करुन सर्वसमावेशक धोरणे आखून विकासाला गती देण्याची लोकांची मागणी आहे. लोकसंख्येच्या वाढत्या घनतेमुळे शहरीकरणाचे नवीन प्रश्न निर्माण होत असून त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांपुढेच आहे. अशा वेळेस एकदिलाने एकत्र होत सर्वांनी सामूहिक प्रयत्न केल्यास बारामतीचा नावलौकीक वाढण्यास त्याची अधिक मदत होईल. 

 

Web Title: The demand for work to be united for the propar development