शिवाजीराजांकडून लोकसत्ताक राज्य - डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

बारामती शहर - ‘‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे राजे म्हणून जन्माला आलेले नव्हते; तर त्यांनी रयतेच्या राज्याची स्थापना करून लोकसत्ताक राज्य स्थापन केले. त्यामुळे आज साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांना लोक स्फूर्तिस्थान मानतात,’’ असे प्रतिपादन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.  

बारामती शहर - ‘‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे राजे म्हणून जन्माला आलेले नव्हते; तर त्यांनी रयतेच्या राज्याची स्थापना करून लोकसत्ताक राज्य स्थापन केले. त्यामुळे आज साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांना लोक स्फूर्तिस्थान मानतात,’’ असे प्रतिपादन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.  

एन्व्हॉर्यन्मेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिबिंब व्याख्यानमालेअंतर्गत आज डॉ. अमोल कोल्हे यांचे ‘शिवाजी- दि मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर व्याख्यान झाले. गदिमा सभागृहासारखे सभागृह आज या व्याख्यानाला अपुरे पडले इतका उदंड प्रतिसाद बारामतीकरांनी या व्याख्यानास दिला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, संस्थेचे विश्वस्त व बारामती बॅंकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची आदी उपस्थित होते. मनुष्याच्या जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी देवत्व प्राप्त केले, असे छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षांपूर्वीही किती व्यापक विचारांचे आणि दूरदृष्टीचे होते, याचे उदाहरणासहित स्पष्टीकरण कोल्हे यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘आपली ताकद ओळखा, कमकुवत बाजू विचारात घ्या. संधी शोधून त्याचे सोने करा.

आपल्यासमोरील धोके ओळखा आणि जे ध्येय गाठायचे आहे, ते निश्‍चित करावे, हेच महाराजांनी शिकविले. संकटावर स्वार होत त्यावर कशी मात करायची आणि ध्येयाच्या आड येणाऱ्या प्रत्येक बाबीवर मात करत पुढे कसे जायचे, याचे वस्तुपाठच महाराजांनी समाजापुढे घालून दिले.’’

‘महाराजांच्या स्वराज्यास नैतिकचे अधिष्ठान’ 
‘‘महाराजांच्या स्वराज्याला नैतिकचे अधिष्ठान होते. युवकांनीही कोणत्याही क्षेत्रात करिअर केले, तरी त्याला नैतिकतेची जोड दिली; तरच ते यशस्वी होतील, असा मंत्रही त्यांनी दिला. स्वराज्य रक्षणासाठी शिवरायांनी किती बारकाईने प्रत्येक गोष्टीचा विचार केला. त्यामुळेच त्यांची ओळख रयतेचा राजा अशी झाली. आजच्या युवकांनीही आपापल्या करिअरमध्ये महाराजांप्रमाणेच छोट्या छोट्या गोष्टींचा सातत्याने विचार करायला हवा,’’ असेही कोल्हे यांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करताना विधायक उपक्रमांनी ती साजरी व्हायला हवी. जर विधायक कामे होणार असतील; तर वर्षभर ही जयंती साजरी करायला हरकत नाही.
 - डॉ. अमोल कोल्हे, अभिनेते 

Web Title: Democrat State from ShivajiRaje Amol Kolhe