रविवारचा दिवसही रांगेतच ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

पुणे : 'वीकेंड'चा मूड, बॅंकांना सुट्या आणि एटीएम बंद असे चित्र शनिवारी दिसत होते. पैसे भरलेले नसल्यामुळे शहरातील बहुतांश भागातील एटीएम केंद्र दुपारपर्यंत बंदच होती.

दुपारनंतर पैसे भरण्यात आल्यामुळे काही एटीएम सुरू करण्यात आले. त्यानंतर मात्र एटीएमबाहेर छोट्या रांगा लागल्याचेही दिसून आले. 

पुणे : 'वीकेंड'चा मूड, बॅंकांना सुट्या आणि एटीएम बंद असे चित्र शनिवारी दिसत होते. पैसे भरलेले नसल्यामुळे शहरातील बहुतांश भागातील एटीएम केंद्र दुपारपर्यंत बंदच होती.

दुपारनंतर पैसे भरण्यात आल्यामुळे काही एटीएम सुरू करण्यात आले. त्यानंतर मात्र एटीएमबाहेर छोट्या रांगा लागल्याचेही दिसून आले. 

चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा 8 नोव्हेंबरच्या रात्रीपासून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा परत करण्यासाठी नागरिकांकडून बॅंकांमध्ये दररोज गर्दी करण्यात येत होती. पहिल्या आठवड्यानंतर या रांगा काही प्रमाणात कमी होऊ लागल्या. तसेच शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर शहरातील काही एटीएम केंद्र सुरू झाली. एटीएम सुरू झाल्यानंतर त्याबाहेर रांगा दिसत होत्या. त्या आता कमी झाल्या आहेत. आता एक हजार रुपयांची नोट व्यवहारात स्वीकारण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मात्र पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा पेट्रोल पंप व अत्यावश्‍यक सेवांसाठी स्वीकारण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटाही बॅंकांकडे पोचल्यामुळे आता सुट्या पैशांची चणचण कमी झाली आहे. 

बॅंका आज चौथा शनिवार असल्यामुळे बंद आहेत. तसेच रविवारचीही सुटी आहे. त्यामुळे आता बॅंक थेट सोमवारीच सुरू होणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री भरण्यात आलेली एटीएम केंद्रांमधील कॅश शनिवारी सकाळीच संपल्यामुळे शहरातील बहुतांश एटीएम बंद झाली. त्यानंतर दुपारपासून मध्यवर्ती भागासह काही ठिकाणचे एटीएम पुन्हा सुरू झाले. 

बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सोमवारी सकाळी बॅंकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झाल्यावर थोडी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. दोन दिवसांच्या सुटीनंतर हजार रुपयांच्या नोटा जमा करून घेण्यावर भर देण्यात येत आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटाही येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना त्या वितरित करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात परिस्थिती पूर्णपणे निवळेल.'' 

पेट्रोल पंपावर नोटा स्वीकारणे सुरू 
''पेट्रोल पंपांवर पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे त्या स्वीकारण्यात येत आहेत. मात्र सुट्या पैशांची चणचण अजूनही काही प्रमाणात जाणवत असल्यामुळे नागरिकांनी थोडे सहकार्य करावे. दोनशे रुपयांचे पेट्रोल भरून दोन हजार रुपयांची नोट देण्याचे प्रकारही पंपावर घडत आहेत. नागरिकांना नकार द्यायचा नाही, असेच सकारात्मक धोरण असल्यामुळे आम्ही जुनी पाचशेची नोट स्वीकारून सर्वांना सुटे पैसे देत आहोत,'' अशी माहिती लक्ष्मी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंप व्यवस्थापनाने दिली.

Web Title: Demonetisation: ATM queues will continue on Sunday in Pune