एकत्रित प्रयत्नांतून होईल डेंगीवर मात 

एकत्रित प्रयत्नांतून होईल डेंगीवर मात 

यंदा पावसाने पुणेकरांवर कृपादृष्टी दाखविली; पण त्याचवेळी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था उभारण्यात महापालिका प्रशासन नापास झाल्याचे डेंगी आणि चिकुनगुनियाच्या तापाने फणफणलेल्या रुग्णांवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षी शहरात चिकुनगुनियाचे सहासष्ट रुग्ण आढलले होते; पण यंदा या रुग्णांची संख्या एक हजारांवर गेली आहे. पावसाळ्यापूर्वीच्या तयारीत महापालिका प्रशासन कमी पडल्याचाच हा परिणाम आहे. 

मॉन्सून सरींना सुरवात होताच डेंगी, चिकुनगुनिया आणि हिवताप या कीटकजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. एकेका दिवसामध्ये डेंगीचा संशयित असलेल्या दहा रुग्णांची नोंद महापालिकेत होत आहे. प्रत्यक्षात खासगी डॉक्‍टरांकडे होणाऱ्या डेंगीच्या निदानाचा आकडा त्यात मिळवला, तर खऱ्या रुग्णांचा आकडा कितीतरी अधिक भरेल. 

शहरात पावसाच्या सरी पडल्याने सुप्तावस्थेत असलेल्या डेंगीच्या एडिस इजिप्ती डासांचा प्रादुर्भाव वाढतो. दर वर्षी पावसाळ्यात डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढते; पण गेल्या दोन वर्षांमध्ये चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. देशात डेंगीचा सर्वाधिक फैलाव होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर होत आहे. एडिस इजिप्ती डासाची मादी साचलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते; तसेच हा डास दिवसा चावतो, त्यामुळे कामानिमित्त बाहेर असलेले शहरातील तरुण डेंगीच्या तापाने फणफणत असल्याचा निष्कर्ष महापालिकेने काढला आहे. 20 ते 45 वर्षे वयोगटातील 60 टक्के पुरुषांना आणि 40 टक्के महिलांना डेंगी झाल्याचेही महापालिकेने अहवालात नमूद केले आहे. 

डेंगीच्या सलग दोन वर्षे होणाऱ्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने या वर्षी सुरवातीपासून युद्धपातळीवर प्रयत्न करणे अपेक्षित होते. त्यास शहरातील नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यास डेंगी नियंत्रण अशक्‍य कोटीतील गोष्ट ठरेल. महापालिकेने गेल्या वर्षी साडेचार लाख घरांच्या केलेल्या पाहणीतील निष्कर्ष थक्क करणारे आहेत. नागरिकांच्या घरातील फ्रिजचा मागील ट्रे, कुंड्या, फुलदाणी या ठिकाणी एडिस इजिप्ती डासांची अंडी सापडली आहेत. सोसायट्यांचे परिसरही डास उत्पत्तीचे आगार बनले आहेत. सोसायटीतील वापरात नसलेले जलतरण तलाव, परिसरात पडलेले टायर, बाटल्या, नारळाच्या करवंट्या, बाटल्यांची झाकणे यांत साचलेले पावसाचे पाणीदेखील डेंगीच्या डासांची पैदास होण्यासाठी पुरेसे असते, त्यामुळे महापालिका प्रशासन, नागरिक आणि सर्वांत महत्त्वाचा घटक बांधकाम व्यावसायिक यांच्या सहकार्याशिवाय डेंगीसारख्या कीटकजन्य रोगांवर नियंत्रणात आणता येत नाही. यासाठी मुंबईचे उदाहरण पुरेसे ठरावे. त्याच धर्तीवर यंदा पुण्याने प्रयत्न केला पाहिजे. 

या वर्षी पुण्याने प्रथमच पल्स पोलिओच्या धर्तीवर उशिरा का होईना; पण डेंगी नियंत्रणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. घरोघर जाऊन डासांची अंडी शोधण्याचा हा कार्यक्रम असून, ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे. आतातरी त्याची अंमलबजावणी समाधानकारक होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com