डेंगीचा "ताप' वाढतोय

योगिराज प्रभुणे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

असा करा डेंगीला प्रतिबंध 
- डासांना आळा घालणे, हा या रोगाला प्रतिबंध करणारा सर्वोत्तम मार्ग आहे. 
- घराच्या आजूबाजूला पाणी साचून न देणे 
- साचलेले पाणी वेळच्या वेळी रिकामे करावे, 
- संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डास चावण्यापासून रक्षण होऊ शकते 

 

पुणे - शहरात दिवसभरात कुठेही फिरताना तुम्ही काळजी घ्या... कोणत्याही क्षणी डेंगीचा डास तुम्हाला डंख मारू शकतो, अशी स्थिती सध्या आहे. आपल्या परिसरातील किमान एकजण डेंगीच्या लक्षणांनी आजारी असल्याची माहिती मिळत आहे. 

शहरात डेंगीचे रुग्ण गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे; तसेच संशयित रुग्णांची संख्याही गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. सोसायट्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले आहे. जलतरण तलावाच्या जवळचा भाग, कुंड्या, टेरेसवरील साहित्य यात पावसाचे पाणी साचून तेथे डास अंडी घालतात. त्यातून डेंगीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदवले आहे. 

वय वर्षे 25 ते 34 या वयोगटातील स्त्री-पुरुषांना सर्वाधिक डेंगी झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. या वयोगटातील माणसे बहुतांश वेळ घराबाहेर असतात. वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त फिरत असतात. डेंगीचा डास दिवसाच चावतो. त्यामुळे त्यांना सर्वाधिक डेंगी झाल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. यात स्त्रियांच्या तुलनेत जास्त पुरुष डेंगीच्या तापाने फणफणले असल्याचे समोर आले आहे. 

असा होतो संसर्ग 
आजारी माणसाच्या रक्तातील डेंगीचा विषाणू एडिस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संसर्ग होतो. डेंगीची साथ डासांमुळे वेगाने पसरते. एडिस इजिप्ती हा लहान, काळा डास आहे. त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याचा आकार पाच मिलिमीटर असतो. डास चावल्यानंतर आपल्या शरीरात विषाणू तयार करायला आठ ते दहा दिवस लागतात. साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. 

असा करा डेंगीला प्रतिबंध 
- डासांना आळा घालणे, हा या रोगाला प्रतिबंध करणारा सर्वोत्तम मार्ग आहे. 
- घराच्या आजूबाजूला पाणी साचून न देणे 
- साचलेले पाणी वेळच्या वेळी रिकामे करावे, 
- संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डास चावण्यापासून रक्षण होऊ शकते 

""आपल्या घराच्या, कार्यालयाच्या परिसरात पाणी साचून डासांची पैदास होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच, डासांची मोठ्या प्रमाणात पैदास असलेल्या 15 जणांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.'' 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका 

""बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्यांपैकी निम्म्या रुग्णांना डेंगीची लक्षणे दिसून येत आहेत. ताप, थंडी, सर्दी, खोकला अशी ही लक्षणे दिसतात. वातावरणातील बदलांमुळे विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवस निरीक्षण करून रुग्णांना डेंगीची चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.'' 
-डॉ. राहुल कदम, 

""कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागते. त्यामुळे नेमका कुठे डास चावला कळत नाही. पण, डासांची पैदास होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. त्यामुळे माणूस आजारी पडतो, उपचारांसाठी पैसे खर्च होतात आणि कामाचे दिवसदेखील वाया जातात.'' 
-संतोष काशीद, रुग्ण

Web Title: Dengue fever is growing in city