डासांचा डंख पडतोय महागात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पुणे - शहरात डेंगी आणि चिकुनगुनिया फैलावणाऱ्या एडिस इजिप्ती डासांचा एक डंख पुणेकरांना महागात पडत आहे. त्याच्या उपचारांच्या खर्चाने कोटीचा आकडा गाठल्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. औषधे, वैद्यकीय चाचण्या, डॉक्‍टरांची फी, रुग्णालयांचा खर्च या प्रमुख खर्चांचा यात समावेश असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

पुणे - शहरात डेंगी आणि चिकुनगुनिया फैलावणाऱ्या एडिस इजिप्ती डासांचा एक डंख पुणेकरांना महागात पडत आहे. त्याच्या उपचारांच्या खर्चाने कोटीचा आकडा गाठल्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. औषधे, वैद्यकीय चाचण्या, डॉक्‍टरांची फी, रुग्णालयांचा खर्च या प्रमुख खर्चांचा यात समावेश असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 28 दिवसांमध्ये शहरात डेंगीचे 795 आणि चिकुनगुनियाचे 354 रुग्ण आढळले आहेत. त्यात डेंगीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर शहरात डेंगी आणि चिकुनगुनियाच्या उपचारांसाठी रुग्णांना एक हजारापासून ते 40 हजारांपर्यंत खर्च करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत खर्चाच्या या आकड्याने कोटीचा आकडा गाठला आहे. 

डेंगीच्या संशयाने घाबरू नका 
ताप येणे, थंडी, अंगदुखी ही लक्षणे दिसल्याने डेंगीचा संसर्ग झाल्याच्या संशयाने घाबरून जाऊन रुग्णालयात दाखल होण्याचा आग्रह रुग्ण आणि त्याचे नातेवाईक करत आहेत. त्यामुळे डेंगीच्या उपचाराचा खर्च वाढत असल्याचे निरीक्षण शहरातील डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. डेंगी किंवा चिकुनगुनिया या आजारांवर निश्‍चित उपचार नाहीत; पण रुग्णाने सांगितलेल्या तक्रारींच्या आधारावर त्याला औषधे दिली जातात. त्यातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. 

अकरा दिवसांचा आजार 
बालरोगतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ""डेंगी हा अकरा दिवसांचा आजार आहे. रुग्णाला पहिले तीन ते चार दिवस खूप ताप येतो. त्यानंतर औषधांमुळे ताप कमी होतो; पण ताप पुन्हा फणफणल्यास तातडीने पुन्हा वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे. सध्याच्या काळात सुरू असलेल्या डेंगीमध्ये 90 ते 95 टक्के रुग्ण अत्यवस्थ होत नाहीत. योग्य औषधोपचाराने हा आजार बरा होतो. 

उपचाराचा वाढता खर्च 
रुग्णालयात जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी चार दिवस दाखल झालेल्या डेंगीच्या एका रुग्णाचा खर्च 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत जात आहे. त्यात औषधांचाही समावेश असल्याची माहिती एका खासगी रुग्णालयाने दिली. 

का वाढतो खर्च? 
डेंगीचे निदान झाल्यानंतर रुग्ण वारंवार रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण तपासतो. त्यातून खर्च वाढतो. डेंगीवर उपचारासाठी पॅरासेटमॉल हे प्रभावी औषध आहे.  त्याशिवाय इतर लक्षणांप्रमाणे औषधांचे प्रमाण वाढवावे लागते. तसेच, रुग्ण बरा झाल्यानंतर अशक्तपणा कमी करण्यासाठी काही औषधे द्यावी लागतात. या 
सर्वांचा खर्च हजार रुपयांपेक्षा जास्त नसतो. मात्र, प्लेटलेटचे प्रमाण वाढविणारी औषधे, फळे यांच्या खरेदीमुळे उपचारांचा खर्च वाढतो, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले. 

पॅरासेटमॉलची मागणी वाढली 
शहरात कीटकजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने पुणेकर तापाने फणफणले आहेत. तापावर सर्वाधिक प्रभावी ठरलेल्या पॅरासेटमॉलची शहरातील मागणी वाढली असल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. याबाबत नितीन देव म्हणाले, ""गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील पॅरासेटमॉलची मागणी 35 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 

ही काळजी घ्या 
- पूर्ण विश्रांती 
- चौरस आहार 
- भरपूर पाणी 

हे टाळा 
- मनाने औषधे घेऊ नका 
- डॉक्‍टरांच्या सल्ल्याने प्लेटलेटचे प्रमाण तपासा 
- डेंगीने घाबरून जाऊ नका 

माझी पत्नी गेल्या महिन्यात तापाने आजारी पडली. प्राथमिक चाचणीनंतर डॉक्‍टरांनी औषधे दिली. काही दिवस ताप उतरला नाही तेव्हा प्लेटलेटची तपासणी 
करण्यास सांगितली. त्यात डेंगीचे निदान झाले. त्यानंतर डॉक्‍टरांनी पुन्हा औषधे दिली. अशाप्रकारे औषधे, प्रतिजैविके, वारंवार वैद्यकीय तपासण्या, डॉक्‍टरांची फी यासाठी दहा दिवसांत सुमारे सहा हजार रुपये खर्च झाला. 
- रमाकांत प्रसादे 

Web Title: Dengue Mosquitoes stick