आळंदीमध्ये डेंगी रुग्णांच्या संख्येत वाढ

आळंदीमध्ये डेंगी रुग्णांच्या संख्येत वाढ

आळंदी - आळंदी पालिका हद्दीत डेंगीच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये आणखी एक जणासह मरकळ रस्त्यावरील आणखी दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

आळंदीत भरणारी आषाढी वारी अवघ्या दोन आठवड्यांवर आली आहे. यात्रेच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांपासून स्थानिक पातळीवर प्रांताधिकारी यांनी वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी बैठका घेतल्या. यामध्ये आरोग्यविषयक सुविधा देण्यावर भर देण्यात आला. मात्र, सध्या आरोग्याच्या समस्येने आळंदीकरांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. 

डेंगीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. प्रशासन डेंगीबाबतचे रिपोर्ट खोटे असल्याचा दावा करीत आहेत. शहरात मात्र स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. महिनाकाठी पंधरा लाख रुपये निव्वळ शहर स्वच्छतेसाठी पालिकेच्या वतीने खर्च केले जात आहेत. मात्र, शहरातील कचरा वेळेत उचलला जात नाही. नालेसफाई वेळेत केली जात नाही. याशिवाय फुटलेली ड्रेनेजची झाकणेही अनेक ठिकाणी बदलली नसल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना पिण्यासाठी पालिकेच्या वतीने सोडण्यात येणारे पाणी अवेळी सोडले जाते. 

पाणी बंद नळाला कधी येईल, याचा भरवसा नाही. यामुळे अनेक जण पाण्याची साठवण करत आहेत. यामुळे मच्छरांची पैदास अधिक झाली. आळंदीत डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत कारभारी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आळंदीकर आता कमालीचे नाराज आहे. मात्र, पालिकेकडून सध्या करत असलेल्या स्वच्छता कुचकामी ठरत आहे. पालिकेकडून केली जाणारी धुरळणी यंत्रणा अभावाने नागरिकांना दिसून येते. तर, जंतुनाशक पावडरही ठराविक ठिकाणीच फवारली जात आहे. जंतुनाशक पावडर मागणी करूनही नागरिकांना पुरवली जात नसल्याची शहरातील नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांच्या तक्रारीला प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com