खडकी परिसरात डेंगीच्या रुग्णांत वाढ

Dengue
Dengue

पुणे - पुण्यात सध्याच्या वातावरणात साथीचे आजार पसरत असून, स्वाइन फ्लू, डेंगी, चिकुनगुन्यासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ आणि १३ मध्ये ऑक्‍टोबर महिन्यात डेंगी रुग्णाची संख्या २६ व ८ होती; तर चिकुनगुन्याचा एक रुग्ण आढळला होता. खडकी कॅंटोन्मेंटमध्येही सध्या डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती आंबेडकर रुग्णालय प्रशासनाने दिली. 

सध्या रुग्णालयात डेंगीचे ८; तर चिकुनगुन्याचे ४ रुग्ण पॉझिटिव्ह असून दररोज तशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या तपासणीसाठी येत असल्याची माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

खडकी बाजारातील विविध खासगी क्‍लिनिकमध्ये दररोज डेंगीसदृश रुग्ण तपासणीसाठी येत असल्याचे चित्र आहे. ताप, सर्दी, खोकला यासह शरीरावर पुरळ येणे, उलट्या, मळमळ होणे आदी लक्षणे डेंगीची असून अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरित रक्त-लघवी तपासावी, असा सल्ला देत असल्याचे खासगी डॉक्‍टरांनी सांगितले. 

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्याबाबतीत संख्या सांगता येत नाही कारण तशी लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात व अत्यवस्थ रुग्णाला जीवरक्षक प्रणालीवर ठेवले जाते. आंबेडकर रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याने त्या रुग्णाला ससून, वायसीएम किंवा डी. वाय. पाटील रुग्णालयात हलवले जाते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 

याबाबत आरोग्य अधीक्षक बी. एस. नाईक म्हणाले, की कॅंटोन्मेंट हद्दीत दररोज औषधफवारणी केली जात असून नागरिकांनी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. सध्या पावसामुळे अनेक भागात गवत वाढले आहे. ते कापण्याचे काम बोर्डाचे कर्मचारी करत असून रोगराई पसरू नये यासाठी बोर्डाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com