डेंगी रुग्णांमुळे गावांमध्ये सर्वेक्षण

Dengue
Dengue

कोंढवे धावडे - शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे या गावांत मागील महिन्यापासून डेंगीचे १५ रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या (एनआयव्ही) अधिकाऱ्यांनी या गावात येऊन डेंगीसदृश तापाचे रुग्ण असलेल्या ३० जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, परिसरीत सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सांगरूण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावात घरोघरी जाऊन कोण आजारी आहे का, याचे सर्वेक्षण शुक्रवारपासून सुरू झालेले आहे. याबाबत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप बोरा यांनी गावात बैठक घेतली. सांगरूण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय वनखांडे, सरपंच नितीन धावडे, उपसरपंच राजू राठोड व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

डॉ. बोरा यांनी सांगरूण प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांची वेगवेगळी पथके करून हे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. दाट लोकवस्ती, झोपडपट्टी परिसर असलेल्या भागात जास्त रुग्ण असल्याने तेथे प्रामुख्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे.  कोंढवे- धावडे गावात सहा हजार घरे असून सुमारे २५ हजार लोकसंख्या आहे.

लोकांची मदत पाहिजे
साथीचा रोग असल्याने घरोघरी सर्वेक्षण सुरू असताना लोकांचा सहभाग पाहिजे. घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करा. गावात सगळ्यांनी ठरवून एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे आणि गावात एकाच दिवशी धूर फवारणी झाली पाहिजे, असे डॉ. बोरा यांनी सांगितले. 

महापालिकेने सहकार्य करावे
शिवणे, उत्तमनगर कोंढवे धावडे, न्यू कोपरे या चार गावांत डेंगी लागण झाल्याची शंका आहे. शिवणे, उत्तमनगर ही गावे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. ही चार गावे एकत्रित सलग आहेत. येथे सर्व उपाययोजना एकाच वेळी झाल्यास साथ आटोक्‍यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com