सरकारच्या धोरणांमुळे मंदी - डॉ. मुणगेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

अर्थव्यवस्था दिवाळखोरीला गेल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या राखीव निधीतून सरकारने पावणेदोन लाख कोटी रुपये घेतले आहेत. सरकारमध्ये आर्थिक तज्ज्ञ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक मंदी आहे, हे समजून घेण्याची कुवतच सरकारमध्ये नाही.
- डॉ. भालचंद्र मुणगेकर, अर्थतज्ज्ञ

पुणे - ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदीची लाट आली आहे. त्यावर तातडीने उपयोजना केल्या नाही, तर मंदी आणखी तीव्र होण्याची भीती केंद्रीय नियोजन समितीचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. 

देशातील हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन अर्थतज्ज्ञांची परिषद बोलविण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. काँग्रेस भवनात ‘अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती व त्यावर उपाययोजना’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. परंतु सरकार ते कबूल करण्यास तयार नाही. सर्वच क्षेत्रांना सध्या मंदीचा फटका बसत आहे. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कमी झाले आहे. बेरोजगारांची संख्या वाढली आहे.’’

या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारी गुंतवणूक वाढवावी, मनरेगा सारख्या कल्याणकारी योजनांना भरभक्कम निधी द्यावा, औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्राला जीएसटीमध्ये सवलत द्यावी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव गुंतवणूक करावी आदी उपयोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Depression due to government policies Bhalchandra Mungekar