लखलखता निखाराच त्यांच्यासाठी दिवा 

नीलेश बोरुडे 
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

आज जिकडे तिकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. जो-तो नवनवीन वस्तूंच्या, कपड्यांच्या खरेदीत दंग आहे. पवार कुटुंब मात्र लखलखत्या निखाऱ्याला दिवाळीचा दिवा समजून आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यात गुंतलेले आहे. आम्हाला हक्काचा निवारा देण्यासाठी प्रशासनासह दानशुरांनी तत्परता दाखवावी, अशी त्यांची व्यथा आहे.

पुणे : आज जिकडे तिकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. जो-तो नवनवीन वस्तूंच्या, कपड्यांच्या खरेदीत दंग आहे. पवार कुटुंब मात्र लखलखत्या निखाऱ्याला दिवाळीचा दिवा समजून आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यात गुंतलेले आहे. आम्हाला हक्काचा निवारा देण्यासाठी प्रशासनासह दानशुरांनी तत्परता दाखवावी, ही माफक अपेक्षा पवार कुटुंबाची आहे. 
पुण्यातील  सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्यावर शिवकालीन इतिहास असलेले पवार कुटुंब आजही शिक्षण, आरोग्य, निवारा अशा मूलभूत गरजांपासून दूर आहेत. रस्त्याच्या कडेला छोट्याशा झोपडीत ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करून हालअपेष्टा सहन करत जीवन जगत आहे. 
शांताबाई पवार (वय 55) या आपल्या सासू हिराबाई पवार (वय 75) व नात पूजा साळुंखे यांच्यासह नांदेड फाट्यावरील गणेश मंगल कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला छोट्याशा झोपडीत आपला संसार चालवतात. सोळा वर्षांपूर्वी शांताबाई पवार यांचे पती काळूराम पवार यांचे निधन झाले. घरातील एकमेव असलेला आधार हरपला; परंतु शांताबाई पवार व हिराबाई पवार यांनी धीर सोडला नाही. शांताबाई यांनी स्वतः हातोडा हातात घेतला व सासूबाईंच्या मदतीने पोट भरण्यासाठी घिसाडी कामाचा व्यवसाय सुरू ठेवला. 
मूळचे राजस्थानमधील चितोडगडचे रहिवासी असलेल्या या कुटुंबासह अन्य काही शस्त्रे बनवण्यात पारंगत असलेल्या घिसाडी समाजातील कुटुंबांना त्यांची कला ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात राजाश्रय दिला होता. तलवारी, ढाल, चाकू, गुप्ती, दांडपट्टा अशी वेगवेगळी हत्यारे बनवण्यात हा समाज पारंगत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आधार दिल्यामुळे मूळचा चितोडगडचा रहिवासी असलेला समाज महाराष्ट्रातच स्थिरावला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मात्र हा समाज अजूनही अप्रगत राहिला आहे. आजच्या बदलत्या काळातही शिक्षण, आरोग्य, निवारा अशा मूलभूत गरजाही या समाजापासून खूप दूर आहेत. 
नांदेड फाटा येथे वास्तव्याला असलेले हे पवार कुटुंब विळा, खुरपे, कुदळ, कुऱ्हाड अशी शेतकऱ्यांना लागणारी हत्यारे व अवजारे तसेच विविध लोखंडी उपकरणांना धार लावणे अशी कामे करून दिवसाला मिळणाऱ्या शंभर ते दोनशे रुपयांवार गुजराण करत आहे. 
राहायला छोटीशी झोपडी आहे. तीही या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे पडली आहे. घरात पुरुष कोणीही नाही. सासुबाई भाता फिरवते व शांताबाई पवार खुललेल्या निखाऱ्यात लाल झालेल्या लोखंडावर घाव घालून त्याला हवा तसा आकार देतात. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या हजारो नजरा या वयस्कर रणरागिनींना पाहत असतील; परंतु यांच्या मदतीसाठी अजून कोणीही पुढे आलेले नाही.
 

आमचं येथील मतदान कार्ड आहे. पिवळे रेशन कार्ड आहे; पण त्याचा काही उपयोग नाही. निवडणुकीपुरते नेते आमच्यापर्यंत येतात; परंतु त्यानंतर आमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. आम्हाला राहायला घर नाही, शौचालय नाही, पाण्याचा नळ नाही, रस्त्यावरचे सगळे पाणी आमच्या झोपडीत शिरते. रात्र-रात्रभर आम्हाला लोखंडी खाटेवर बसून राहावं लागतं. 
- शांताबाई पवार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deprived of basic facilities of pawar family