एअर स्ट्राइक जिंकली, ‘पर्सेप्शन’ हरलो - भूषण गोखले

एअर स्ट्राइक जिंकली, ‘पर्सेप्शन’ हरलो - भूषण गोखले

पुणे - ‘भारतीय हवाईदलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ यशस्वीरीत्या उद्‌ध्वस्त केले. सर्व पुरावे जगासमोर सादर केले. त्यानंतर पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमानही आपण पाडले. परंतु, या शौर्यावर विविध प्रकारे शंका घेण्यात आल्या. त्यामुळे पाकिस्तानसोबतच्या पर्सेप्शन (आकलन) युद्धात आपण हरलो, अशी खंत भारतीय हवाईदलाचे निवृत्त उपप्रमुख भूषण गोखले यांनी व्यक्त केली.

वसंत व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पात ‘भारतीय हवाईदलाची संरक्षणसिद्धता’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी त्यांनी हवाईदलाच्या इतिहासाबरोबरच भविष्यातील मनसुब्यांची मांडणी केली. ते म्हणाले, ‘१९६२ च्या युद्धात चीनविरोधात हवाईदलाचा वापर झाला नाही. त्यामुळे आजही ‘डोकलाम’सारख्या वादाला सामोरे जावे लागते. परंतु, त्यानंतर पाकिस्तानच्या युद्धात तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हवाईदलाचा वापर केला. त्यामुळे तो विजय सहजशक्‍य झाला.’’ 

ते म्हणाले, ‘‘भारतीय लष्कर युद्ध जिंकते. पण, वाटाघाटीत आपण सदैव अपयशी ठरतो. म्हणूनच ‘ताश्‍कंद करारा’त काश्‍मीर प्रश्‍नाबरोबरच शास्त्रीजींचा गूढ मृत्यू आपल्या वाट्याला येतो.’’ ते म्हणाले, ‘‘पुलवामा हल्ल्यानंतर हवाईदलाने जैसलमेरमध्ये तेरा दिवसांचा युद्धाभ्यास केला. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उद्‌घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी हवाईदलाने इस्रायली ‘स्पाइस बाँब’चा वापर करून बालाकोटवर यशस्वी कारवाई केली. त्यात मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्यांची संख्या त्यांच्या नष्ट होत जाणाऱ्या सरकारी पाऊलखुणांवरून काढण्यात येईल.’’

हवाईहल्ल्यानंतर भारतीय हवाईदलाचे मनोबल उंचाविले असून, पाकिस्तानची अणुबाँबची धमकी निष्फळ ठरली. तरुणांचा देश असलेल्या भारताने सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला हवी.
- भूषण गोखले, निवृत्त उपप्रमुख, हवाईदल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com