उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आकस्मिक निधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणे - पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय 48) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने आकस्मिक निधन झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच उपमहापौरपदावर विराजमान झालेल्या कांबळे यांच्या अकाली मृत्युमुळे शहरातील राजकीय, सामाजिक वर्तुळाला धक्का बसला. आंबेडकरी चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त झाली. मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत कांबळे यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. 

पुणे - पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय 48) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने आकस्मिक निधन झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच उपमहापौरपदावर विराजमान झालेल्या कांबळे यांच्या अकाली मृत्युमुळे शहरातील राजकीय, सामाजिक वर्तुळाला धक्का बसला. आंबेडकरी चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त झाली. मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत कांबळे यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. 

कांबळे यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कांबळे यांच्या मृत्युबद्दल महापालिकेने एक दिवसाचा दुखावटा जाहीर केला आहे. महापालिकेच्या सभागृहात बुधवारी दुपारी तीन वाजता श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. कांबळे नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रेसकोर्सकडे फिरायला निघाले होते. तेथे पोचल्यावर मैदानावर फेऱ्या मारत असतानाच त्यांना सव्वाआठच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यांच्याबरोबर असलेले नाना बाजारे यांनी त्यांना तातडीने रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच कांबळे यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

कांबळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वृत्त "सोशल मीडिया'वरून समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही प्रचंड गर्दी केली होती. घोरपडीतील बीटी कवडे रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी दुपारी दोनच्या सुमारास कांबळे यांचे पार्थिव नेण्यात आले. तेथून सायंकाळी साडेसहाला कोरेगाव पार्कमधील स्मशानभूमीत नेण्यात आले. त्या वेळी राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. रात्री आठच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर अपस्थित होते. 

महापालिकेच्या (फेब्रुवारी 2017) निवडणुकीत कांबळे कोरेगाव पार्क- मुंढवा भागातून (प्रभाग क्रमांक 21) रिपब्लिकन पक्ष-भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर ते निवडून आले. भाजपने उपमहापौरपद रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) देण्याचा निर्णय घेतल्याने या पदावर कांबळे यांची निवड झाली. महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने पक्षाने त्यांच्या नावाला प्राधान्य दिले. महापालिकेच्या 1997, 2002 च्या निवडणुकीतही कांबळे रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून आले होते. परंतु, महापालिकेतील इतके महत्त्वाचे पद त्यांना पहिल्यांदाच मिळाले. रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली होती.

"रिपाइं'चा सच्चा कार्यकर्ता हरपला... 
पुण्याचे विद्यमान उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिपब्लिकन पक्षाचा सच्चा कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केली. 

महापौर मुक्‍ता टिळक : एकाच दिवशी दोघांना पद मिळाले. त्यामुळे कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या कामाचा अंदाज आला. त्या निमित्ताने त्यांच्यातील मितभाषी सहकारी मला दिसून आला. त्यांना सुरवातीच्या काळात संघर्षाला तोंड द्यावे लागल्याने यशाचे महत्त्वही ते जाणून होते. त्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्ता हरवू दिला नाही. त्यामुळेच उपमहापौरपद मिळाल्यानंतरही त्यांचा स्वभाव कायम होता. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील चांगला कार्यकर्ता हरपला आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले - उपमहापौर आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नवनाथ कांबळे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा प्रामाणिक, लढाऊ पॅंथर हरपला आहे. हडपसरजवळील भीमनगरमधून पॅंथर संघटनेची छावणी उभारून चळवळ उभारली. त्याचे फळ म्हणून त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाले आहे. 

पालकमंत्री गिरीश बापट - उपमहापौर व माझे जवळचे मित्र नवनाथ कांबळे यांनी त्यांच्या हयातीत तळागाळातील जनसामान्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. उपमहापौर झाल्यानंतरही त्यांचा कामाचा धडाका कायम होता. दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहात एका बैठकीदरम्यान त्यांची व माझी भेट झाली होती. त्यांचे निघून जाणे मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनाने शहराच्या राजकारणात एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

खासदार अनिल शिरोळे - कांबळे यांच्या निधनामुळे आपण पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील एका सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला मुकलो आहोत. उपमहापौर म्हणून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याची पूर्तता करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील. 

खासदार वंदना चव्हाण - कांबळे यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे रिपब्लिकन पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. दलित पॅंथरच्या लढ्याच्या काळातील सक्रिय कार्यकर्ता हरपला आहे. उपमहापौरपदावर कार्यरत झाल्यावर त्यांचे निधन होणे धक्कादायक आहे. 

महेंद्र कांबळे (शहराध्यक्ष, आरपीआय) - आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे प्रामाणिक व निःस्वार्थीपणे कांबळे काम करत होते. 35 वर्षे त्यांनी गरीब, कष्टकरी, झोपडीधारक, उपेक्षित व वंचितांसाठी कार्य केले. उपमहापौरपद मिळाल्यानंतरही त्यांनी आणखी जोरदारपणे काम केले. त्यांच्या जाण्याने चळवळीतील व पक्षाचा कार्यकर्ता पोरका झाला आहे. 

Web Title: Deputy Mayor Navnath Kamble passed away