चौकीला जागा मिळूनही गुन्ह्यातील वाहने पोलीसठाण्याभोवतीच

गाडीतळ पोलीस चौकी असताना दाखल झालेल्या विविध गुन्ह्यातील वाहने येथील चौकी समोरील उड्डाणपुलाखाली व पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर लावली गेली आहेत.
चौकीला जागा मिळूनही गुन्ह्यातील वाहने पोलीसठाण्याभोवतीच
Summary

गाडीतळ पोलीस चौकी असताना दाखल झालेल्या विविध गुन्ह्यातील वाहने येथील चौकी समोरील उड्डाणपुलाखाली व पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर लावली गेली आहेत.

हडपसर - गाडीतळ येथील पोलीसठाण्यालगतच्या पोलीस चौकीला जागा मिळून स्थलांतरही झाले आहे. मात्र, हक्काची जागा मिळूनही विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने आजूनही पोलीसठाण्या भोवतीच विखुरलेली दिसत आहेत. या वाहनांमुळे परिसरात मोठ्याप्रमाणात बकालपणा वाढला असून घाणीचे साम्राज्यही निर्माण झाले आहे.

गाडीतळ पोलीस चौकी असताना दाखल झालेल्या विविध गुन्ह्यातील वाहने येथील चौकी समोरील उड्डाणपुलाखाली व पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर लावली गेली आहेत. गेली कित्येक वर्षापासून ही वाहने येथे पडलेली दिसत आहेत. त्यातील अनेक वाहने अक्षरशः सडून गेली आहेत. या वाहनांच्या आडोशाने त्याशेजारील मोकळ्या जागेचा प्रवाशांकडून स्वच्छतागृहासारखा वापर केला जात आहे. वाहनांभोवती कचरा साठला आहे. त्यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. या ठिकाणी असलेले पोलीसठाणे, मुख्य बसथांबा, छोटे-मोठे व्यवसायीक यामुळे दररोज हजारो नागरिक येथे येत असतात. या नागरिकांना घाणीच्या साम्राजातून व दुर्गंधी सहन करीत प्रवास करावा लागत आहे.

पालिकेच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडून एकीकडे प्लेगोथॉन सारख्या स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहेत, स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार मिळवले जात आहेत. असे असताना हडपसरचे महत्वाचे केंद्र असलेला गाडीतळ परिसर घाणीच्या विळख्यात कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवासी ऋतुजा हजारे, मंगेश गायकवाड, योगिता शिंदे, प्रसाद तुपे, नेहा हरपळे यांच्यासह स्थानिक व्यवसायीक व रहिवाशांनी केला आहे.

सध्या येथील पोलीस चौकीचे नुकतेच माळवाडी येथील नवीन जागेत स्थलांतर झाले आहे. त्याठिकाणी मोठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे गाडीतळ पौलीसचौकी परिसरात व उड्डाणपूलाखाली उभी केलेली वाहने नवीन ठिकाणी हलविणे आवश्यक आहे. मात्र, स्थानिक पोलीस व पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलीसठाण्यासमोरील रस्ता आगोदरच अरूंद असूनही त्याच रस्त्यावर अतिक्रमण करून गुन्ह्यातील वाहने वर्षोनवर्षे उभी केलेली आहेत. इतर वाहनांना त्यामुळे येथे कायम वाहतूककोंडीशी सामना करावा लागत आहे.

'मी दररोज शहरात नोकरीनिमित्त जात आहे. मात्र, गाडीतळ चौकात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी येत असते. उड्डाणपुलाखालून रस्ता ओलांडताना कुचंबना होते. तेथील वाहने इतरत्र हलवून पुलाखालील जागा स्वच्छ करण्याची गरज आहे.'

- संगिता शिंदे, नोकरदार महिला

'पालिका प्रशासनातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी स्वच्छतेबाबत दुर्लक्ष करीत आहेत. पुलाखाली विद्युत दिवेही नाहीत. पालिकेने परिसर प्रकाशमान केल्यास प्रवासी जागेचा दुरूपयोग करणार नाहीत. पोलिसांनीही गुन्ह्यातील वाहनांसाठी पर्यायी जागेचा वापर करायला पाहिजे.'

- प्रताप पवार, स्थानिक व्यवसायीक

गाडीतळ उड्डाणपूलाखाली पोलिसांनी लावलेली व गेली कित्येक वर्षांपासून जागेवरच असलेली वाहने स्थलांतरित करावीत, यासाठी पोलीसांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून संपूर्ण कार्यवाही झालेली दिसत नाही. येथील वाहने दूर झाल्यास संपूर्ण स्वच्छता करता येईल. तोपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगून शक्यतेवढा परिसर स्वच्छ केला जाईल.'

- प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त, हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

"गुन्ह्यातील वाहने मोठ्याप्रमाणात असल्याने पुलाखाली लावली जात होती. आता अशी वाहने माळवाडी येथील स्थलांतरित पोलीस चौकीच्या परिसरात लावली जात आहेत. सध्या येथे असलेली पूर्वीची वाहनेही टप्प्याटप्याने त्याठिकाणी हलविली जात आहेत.'

- सोमनाथ पडसळकर, उपनिरीक्षक, हडपसर पोलीस चौकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com