सिकल पेशी रक्तक्षयावर प्रभावी औषंधाचा शोध

सम्राट कदम
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

सिकल रक्तक्षय म्हणजे काय?

  • जन्मदात्यांकडून जनुकीय वारशातून हा विकार होतो.
  • शरीरातील विविध अवयवांना ऑक्‍सिजन लाल रक्तपेशींमार्फत पाठविला जातो. मात्र, या विकारात हिमोग्लोबिनचे रूपांतर ‘हिमोग्लोबिन-एस’मध्ये होते. ते लाल गोल रक्तपेशींचा आकार चंद्रकोरीच्या स्वरूपात बदलतात.
  • चंद्रकोरीच्या आकाराच्या पेशींमुळे रक्तवहनात अडथळा येतो.

पुणे - विदर्भ, सापूतारा आणि मराठवाड्यासह देशातील १० लाख २८ हजार लोक ‘सिकल पेशी रक्तक्षया’चा सामना करीत आहेत. त्यावर प्रभावी औषध शोधण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे.

जन्मदात्याकडून वारशाने गुणसूत्राच्या माध्यमातून संक्रमित होणाऱ्या या रक्तक्षयावर रसायनशास्त्र विभागातील डॉ. पूजा दोशी आणि सय्यद मून्तजिब यांनी संशोधन केले आहे. पाच वर्षांच्या संशोधनातून त्यांनी ‘एलिझरिन’ आणि ‘आयसोकर्सिटीन’ ही औषधे सिकल रक्तक्षयासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे.

४ कोटी ७४ लाख जगातील रुग्ण १० लाख 
भारतातील दरवर्षीचे रुग्ण
राज्यात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, नंदुरबारमध्ये ५ हजारांहून अधिक रुग्ण.

‘एलिझरिन’ या औषधावर त्यांचा शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला. तर ‘आयसोकर्सिटीन’वर ‘जर्नल ऑफ बायोमॉलिक्‍यूलर स्ट्रक्‍चर अँड डायनॅमिक्‍स’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

डॉ. दोशी म्हणाल्या, ‘‘सध्या डॉक्‍टर ‘हायड्रॉक्‍सी युरिया’ हे औषध वापरतात. हे औषध रुग्णांवर दुष्परिणाम करते. बाजारात उपलब्ध असलेले ‘आयसोकर्सिटीन’ सिकल पेशींच्या विरोधात प्रभावी काम करीत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे औषध वनस्पतीतून मिळत असल्याने त्याचे दुष्परिणाम नाहीत. गरीबांना सध्या उपलब्ध असलेल्या उपचारपद्धती घेणे शक्‍य होत नाही. या संशोधनामुळे स्वस्त दरात औषधे उपलब्ध होतील.’’ संशोधक विद्यार्थी मून्तजिब म्हणाले, ‘विविध शिबिरांतून आम्ही रक्ताचे नमुने मिळवून संशोधन पूर्ण केले.’’

संशोधनासाठी त्यांना महाराष्ट्र आरोग्य मंडळ, डॉ. सुदाम काटे, ‘सिडॅक’चे सहकार्य लाभले.

आदिवासींना या विकाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्वस्तात औषध उपलब्ध होणे गरजेचे आहे. सध्या वापरात असलेले ‘हायड्रॉक्‍सी युरिया’ महाग आहे, तसेच त्यामुळे पांढऱ्या पेशींवर परिणाम होतो. डॉ. दोशी यांचे संशोधन महत्त्वपूर्ण आहे. प्रत्यक्ष रुग्णांवर याचा प्रयोग होईल तेव्हाच याची उपयुक्तता समोर येईल.
- डॉ. सुदाम काटे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detection of effective drug on sickle cell blood cells