"देवदूत'च्या वाहनांच्या किमती तेरापटीने वाढीव

Devdoot
Devdoot

महापालिकेकडून 81 लाखांच्या वाहनांची 11 कोटींना खरेदी; शोरूम प्राइज व खरेदीत मोठी तफावत 
पुणे - महापालिकेच्या "देवदूत' योजनेतील एका वाहनाची किंमत (शोरूम प्राइज) आजघडीला साडेतेरा लाख रुपये आहे. परंतु, हेच वाहन महापालिकेने दोन वर्षांपूर्वी तब्बल 1 कोटी 84 लाखांत खरेदी केल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. महापालिकेने एका वाहनासाठी मोजलेली किंमत ही कंपनीच्या दरपत्रकाच्या (कोटेशन) प्रमाणात तेरापट अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारची 81 लाखांची वाहने 11 कोटी 41 लाखांत घेण्यात आली आहेत. या किमतीत वाहने खरेदीचा प्रस्ताव मांडून तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तो मंजूर करून घेतला. 

महापालिकेने खरेदी केलेल्या वाहनाची कंपनी, वाहनाची क्षमता, त्यातील सेवा-सुविधा याची माहिती घेऊन वरिष्ठ "आरटीओ' अधिकाऱ्यांनी 
संबंधित कंपनीकडे शहानिशा केली, तेव्हा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी वाहनांच्या किमती फुगवून दाखविल्याचे दिसून आले आहे. 
आपत्ती निवारणाच्या "देवदूत'साठी महापालिकेने 1 कोटी 83 लाख 97 हजार रुपयांचे एक अशी सहा वाहने 11 कोटी 41 लाखांत खरेदी केली आहेत.

ती चालविण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराला 42 कोटी मोजले. ही योजना महागडी असल्याच्या खर्चाच्या तपशिलावरून उघड होताच त्यातील गैरव्यवहार "सकाळ'ने उघडकीस आणला. त्यापलीकडे जाऊन योजनेचा प्रस्ताव, स्थायी समितीचा ठराव आणि त्यातील वाहनाच्या किमतीची कागदपत्रे तपासली असता, मूळ वाहनच तेरापट जादा दराने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आपत्ती नियंत्रणासाठीची रचना असल्याने ही वाहने खरेदी केल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांचा आहे. मात्र, वाहनाची रचना आणि यंत्रसाम्रगी आम्हीच बसविल्याचा दावा ठेकेदाराचे अधिकारी करीत आहेत. त्यामुळेच महापालिका एका वाहनासाठी महिन्याला दहा लाख रुपये देते, असे सांगून ठेकेदारानेही महापालिकेचा खोटेपणा उघड केला आहे. 

'वाहनाचे मॉडेल आणि त्याच्या स्पेसिफिकेशननुसार साडेतेरा लाख रुपये किंमत आहे. या कंपनीच्या अशा वाहनांची किंमत 22 लाखांपेक्षा अधिक नाही.'' 
- प्रादेशिक परिवहन विभाग 

वाहन खरेदीचा प्रस्ताव मंजूर 27 डिसेंबर 2016 
एकूण वाहने खरेदी सहा 
एका वाहनाची क्षमता 17 सीटर 
शोरूम प्राइज 13 लाख 50 हजार 
महापालिकेने दाखविलेली किंमत 1 कोटी 84 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com