कंपनीने केला रस्ता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी ना-नफा तत्त्वावर कंपनीची स्थापना करण्यात आली. पहिल्यांदा रस्त्याचे काम करून तो आता ‘पीएमआरडीए’ला हस्तांतर केला जाणार आहे...
 

गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी ना-नफा तत्त्वावर कंपनीची स्थापना करण्यात आली. पहिल्यांदा रस्त्याचे काम करून तो आता ‘पीएमआरडीए’ला हस्तांतर केला जाणार आहे...
 

पायाभूत सुविधांची सर्व कामे सरकारनेच करावीत, या मानसिकतेला छेद देणारी घटना पुणे परिसरात घडली. त्यामुळे एकही सरकारी पैसा खर्च न होता सिमेंटचा चांगला रस्ता तयार झाला. विकासकामांत आणि प्रशासनात नागरिकांचा सहभाग ही केवळ बोलण्यापुरती बाब नसल्याचेच यातून स्पष्ट झाले. रस्ता तयार करूनच हा सहभाग थांबणार नाही; तर पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्या; तसेच मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे इत्यादी सुविधांसाठीही तो असणार आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रात ही यशकथा आकाराला आली. पुणे परिसराच्या शास्त्रीय नियोजनासाठी ‘पीएमआरडीए’ची स्थापना झाली. पुणे, पिंपरी महापालिका आणि आसपासची सुमारे आठशे गावे एवढे त्याचे क्षेत्र आहे. त्याचे नियोजन करणे आणि विकासाची कामे घेणे हे केवळ सरकारी पातळीवरील काम नव्हे; तर त्यासाठी खासगी सहभाग अत्यावश्‍यक ठरतो. या महानगरांत रस्ते, पाणी, वीज, व्यापारी संकुले, उद्योग इत्यादी पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत. त्यासाठी खासगी कंपन्या आणि सरकारी विभाग यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करावेत, असे अपेक्षित होते. यामध्ये प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी महेश झगडे आणि मुख्य नगर नियोजक विवेक खरवडकर यांनी पुढाकार घेतला. 

सूस, मुळशी, म्हाळुंगे, पिरंगुट, बावधन आणि माण या गावांमध्ये विकासकामांसाठी ‘पिरंगुट व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ ही कंपनी स्थापली. तिचे उद्दिष्ट नफा कमाविणे असणार नाही, असे कंपनीच्या प्रवर्तकांनी ठरविले. त्यातील पहिली योजना म्हणून रस्त्यांची निवड झाली. सूसमधील पिनॅकल ग्रुपच्या निलांचल गृहप्रकल्पापासून सुरू होणारा हा रस्ता बाणेर येथील महामार्गाच्या जोडरस्त्यापर्यंत जातो. त्यासाठी संजीवनी डेव्हलपर्स, जार्डिन प्रोप्रायटर्स, तीर्थ डेव्हलपर्स, सारथी ग्रुप, अतुल भळगट, एस. आर. कुलकर्णी डेव्हलपर्स, विलास जावडेकर ग्रुप एकत्र आले. ‘संजीवनी’चे संजय देशपांडे, जावडेकर ग्रुपचे सर्वेश जावडेकर; तसेच धनंजय पाचपोर आदींनी त्यात पुढाकार घेतला. 

सूस आणि म्हाळुंगेचा भाग पाच वर्षांपासून वेगाने विकसित होतोय. त्यातील जमिनीचा निवासी आणि व्यापारी प्रकल्पांसाठी मिश्र वापर होतोय. त्यामुळे या भागातील आयटी; तसेच वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. तथापि, रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांची वानवा होती. त्यामुळे खासगी विकसक एकत्र आले आणि त्यांनी कंपनीची स्थापना केली. या कंपनीने स्वखर्चाने सुमारे १.६ किलोमीटरचा रस्ता बनवला. तो प्रादेशिक आराखड्यातील नियोजित रस्ता असून, तो खासगी जागेतून जातो. तो प्राधिकरणाला हस्तांतर करण्यात येणार आहे. या बदल्यात कंपनीतील विकसकांना चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे. अशा प्रकारे सरकारी संस्था आणि खासगी व्यक्ती किंवा कंपन्या एकत्र आल्या, तर ‘पीएमआरडीए’च्या विकसनाचे काम वेगाने होईल, असा विश्‍वास देशपांडे यांनी व्यक्त केला.

Web Title: develop road