पर्यटन संस्कृतीचा विकास करावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

आपलं पुणं, आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आपण जाणतो. राज्यातील उत्तुंग सह्याद्री कडे आपल्याला सतत साद घालत असतात. फेसाळणाऱ्या समुद्राच्या ओढीने आपण कोकणात उतरतो. पण, हेच निसर्गाचे सौंदर्य आम्ही जगापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्नांना सरकारी मदतीची साथ हवीय... अशी अपेक्षा शहरातील पर्यटन क्षेत्रातील विविध संस्थांनी व्यक्त केली.

पुणे- आपलं पुणं, आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आपण जाणतो. राज्यातील उत्तुंग सह्याद्री कडे आपल्याला सतत साद घालत असतात. फेसाळणाऱ्या समुद्राच्या ओढीने आपण कोकणात उतरतो. पण, हेच निसर्गाचे सौंदर्य आम्ही जगापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्नांना सरकारी मदतीची साथ हवीय... अशी अपेक्षा शहरातील पर्यटन क्षेत्रातील विविध संस्थांनी व्यक्त केली.

निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, प्राचीन कलाकृती, धार्मिक स्थळे, तरुणांसाठी साहस, अशा पर्यटनाच्या विविध पैलूंनी महाराष्ट्र समृद्ध आहे. पण, देशांतर्गत पर्यटन म्हटलं, की काश्‍मीर, राजस्थान, केरळ याबरोबरीने महाराष्ट्राचं नाव अग्रक्रमाने घेतलं जावं, यासाठी वेगवेगळ्या पर्यटन संस्थांनी पुढाकार घेतला आहे. आपलं पुणं, आपला महाराष्ट्र, येथील निसर्गसौंदर्य, याचा इतिहास, त्याची वैशिष्ट्यं आम्ही जगासमोर घेऊन जातोय. पर्यटनाच्यादृष्टीने महाराष्ट्राच्या विकासाचा प्रयत्न करतोय... जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजित बैठकीत पर्यटन क्षेत्रातील संस्थाचालक बोलत होते.

‘सिमास ट्रॅव्हल्स’चे डॉ. विश्‍वास केळकर, ‘केसरी टुर्स’च्या झेलम चौबळ, ‘मॅंगो हॉलिडेज्‌’चे मिलिंद बाबर, ‘गिरिकंद ट्रॅव्हल्स’चे अखिलेश जोशी आणि विनायक वाकचौरे, कॅप्टन नीलेश गायकवाड, ‘भाग्यश्री ट्रॅव्हलर्स’चे विवेक गोळे, ‘एस.टी.ए. हॉलिडेज्‌’चे अजित सांगळे, ‘देवम्‌ टुर्स’चे नीलेश भंसाळी... आदी सहभागी झाले होते. 

महाराष्ट्रातील लोकांना जगाच्या कानाकोपऱ्यांत आम्ही पर्यटनाच्या निमित्ताने घेऊन जातो; अन्य देशांतील पर्यटकांना महाराष्ट्राचे दर्शन घडविण्याची आमची प्रामाणिक इच्छा आहे. आमच्या प्रयत्नांना सरकारी यंत्रणांची मदत हवी आहे. पर्यटनाचा विकास करण्यासाठी रस्ते, पाणी, स्वच्छता, दळण-वळण, पर्यटकांची सुरक्षितता अशी भक्कम पायाभूत व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. राज्यात पर्यटन संस्कृतीचा विकास करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. त्यातून स्थानिकांना व्यवसायाच्या संधी मिळतात. हातांनाही काम मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लोणार पर्यटनाचा मानबिंदू
उल्कापातातून नैसर्गिकरीत्या निर्माण झालेले लोणार सरोवर हा राज्यातील पर्यटनाच्या मानबिंदूंपैकी एक घटक. लेण्या, समुद्रकिनारे यातून पर्यटनाच्या विकासाची क्षमता राज्यात आहे. त्याचे योग्य पद्धतीने ‘मार्केटिंग’ होणे, हीदेखील आधुनिक काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Develop a tourism culture