लोकसहभागातूनच विकास - आयुक्त हर्डीकर
नवी सांगवी - ‘‘लोकसहभागाशिवाय विकास होत नाही. त्यामुळे देशात शहराचा नावलौकिक राखाण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्मार्ट सिटीसाठी पुढे आले पाहिजे,’’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
नवी सांगवी - ‘‘लोकसहभागाशिवाय विकास होत नाही. त्यामुळे देशात शहराचा नावलौकिक राखाण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्मार्ट सिटीसाठी पुढे आले पाहिजे,’’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
पिंपळे सौदागर येथे शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशनच्या वतीने ‘स्मार्ट सिटी प्रकल्प सादरीकरण व नागरी संवाद’ हा कार्यक्रम गोविंद गार्डनमध्ये आयोजित केला होता. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, सहशहर अभियंता राजन पाटील, स्मार्ट सिटीचे अधिकारी निळकंठ पोमण, स्वीकृत प्रभाग सदस्य संदीप नखाते उपस्थित होते.
हर्डीकर यांनी स्मार्टसिटी संदर्भातील संकल्पना चित्रफितीद्वारे स्पष्ट केली. स्थानिक नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले व त्यांच्या सूचनाही मागविल्या. लोकांनीही आयुक्त, आमदार यांच्याशी मुक्तसंवाद साधला. महापालिकेच्या एरिया बेस डेव्हल्पमेंन्टच्या धर्तीवर पिंपळे गुरव आणि सौदागर येथे तेराशे एकर क्षेत्र स्मार्टसिटी प्रकल्पात आहे. हा परिसर विकसित झाल्यावर तो पाहण्यासाठी देशातून लोक येथे येतील, असा विश्वास व्यक्त केला.
हर्डीकर म्हणाले, ‘‘रस्ते कितीही रुंद झाले, तरी वाहतुकीची कोंडी होते. लोकसंख्या हे त्याचे कारण नाही. जनतेने वर्तणूक, मानसिकता बदलण्याची गरज आहे. मोशी ते लोहगाव हा रस्ता लवकरच नव्वद मीटर रुंद करणार आहे; परंतु परिस्थिती अशीच राहिली तर तेथेही वाहतूक कोंडी होत राहील.’’
जगताप, चिलेकर यांनी मनोगत व्यक्त केले. काटे यांनी प्रस्ताविक करून स्वागत केले. सागर बिरारी यांनी सूत्रसंचालन केले.
शहर स्मार्ट करण्यासाठी विचारही स्मार्ट होणे गरजेचे आहे. बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविण्यापेक्षा ती होणारच नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. कारण बेकायदा बांधकामांमुळे वीज, रस्ते, पाणी यांसारख्या नागरी सुविधांवर ताण पडून शहर विद्रूप बनते. त्यामुळे लोकांनीच बेकायदा बांधकामे करणे टाळावे. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्याकडून खरेदी करता कामा नये.
- लक्ष्मण जगताप, आमदार