‘टीओडी’मुळे सर्वांगीण विकास शक्‍य

PS-Uttarwar
PS-Uttarwar

पुणे - खासगी वाहनांची संख्या देशातील सर्वच शहरांत वाढत आहे. त्यातून प्रदूषण ही गंभीर समस्या मूळ धरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हपलमेंट (टीओडी) आवश्‍यक आहे. त्यामुळे या पुढे शहरांचे नियोजन करताना हाच मुद्दा प्राधान्याने लक्षात घेणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ नगरनियोजक पी. एस. उत्तरवार यांनी म्हटले आहे. 

हेच सूत्र लक्षात घेऊन दिल्लीचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली डेव्हलपमेंट ॲथॉरिटीमधून (डीडीए) अतिरिक्त आयुक्त या पदावरून उत्तरवार नुकतेच निवृत्त झाले आहेत. नगर नियोजनाशी संबंधित विविध पदांवर त्यांनी सुमारे २५ ते ३० वर्षे काम केले आहे. ‘डीडीए’च्या अखत्यारित दिल्लीतील चार महापालिका आहेत. १४८४ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे.

दिल्लीची सध्याची लोकसंख्या सुमारे दोन कोटी आहे. आता २०२१ ते ४१  या वर्षांसाठी चार कोटी ४०   लाख लोकसंख्या गृहीत धरून तो तयार करण्यात येत आहे. त्यात ‘टीओडी’ मुख्य सूत्र आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरे पसरत (होरिझोंटल) गेली तर, पायाभूत सुविधा पुरविण्याचा खर्च वाढतो.

त्यामुळे शहरांचा विकास उंच (व्हर्टिकल) पद्धतीने झाला तर, तुलनेने तो खर्च कमी होतो. तसेच कमी जागेमध्ये लोकसंख्येची घनताही वाढू शकते. या सूत्रानुसार ‘टीओडी’ धोरण तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर नगरनियोजनासाठी आवश्‍यक आहे. ‘बीआरटी’ अत्यंत आवश्‍यक आहे. त्याच्या दोन्ही बाजूलाही वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याची गरज आहे.

पुण्यासाठी ‘व्हर्टिकल’ पद्धतीची गरज
‘‘पुण्याची लोकसंख्या आणि रस्त्यांचे प्रमाण लक्षात घेतले तर, ‘व्हर्टिकल’ पद्धतीने विकास प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वर्गासाठीही १५ टक्के घरे मेट्रो कॉपडॉरमध्ये निर्माण होणार आहेत. परवडणाऱ्या घरांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे मेट्रोसारखे प्रकल्प यशस्वी होऊ शकतील. नगरनियोजन करताना ‘टीओडी’ संकल्पनेचा वापर केला नाही तर, खासगी वाहनांची संख्या वाढू शकते. दिल्लीत तर, आता कार पार्किंगची जागा बांधकाम व्यावसायिक तब्बल २५ लाख रुपयांपर्यंत विकत आहेत. म्हणूनच सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याची गरज आहे. अन त्यातूनच शहरांचा विकास होऊ शकतो,’’ असे  उत्तरवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com