सुशोभीकरणामुळे विश्रांतीनगर चौकाचे रूपडे बदलले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

सिंहगड रस्ता - येथील विश्रांतीनगर चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण झाल्याने या परिसराचा चेहराच बदला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

सिंहगड रस्ता - येथील विश्रांतीनगर चौकाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण झाल्याने या परिसराचा चेहराच बदला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

मुख्य सिंहगड रस्त्याकडून इनामदार चौकातून विश्रांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. रस्त्याच्या दुतर्फा पदपथ करण्यात आले आहे. तर भिंतीवर सुविचार व नागरिकांना उद्युक्त करणारी घोषवाक्‍ये लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे परिसराचे रूपच पालटले आहे. पूर्वी नागरिक रात्री येथून प्रवास करण्याचे टाळत होते. या रस्त्याला कालव्या शेजारील पर्यायी रस्ता जोडला आहे. तर आनंदविहार, हिंगणे, तुकाईनगर, जाधवनगर, सिंहगड महाविद्यालय, वडगाव भागांतून येणारा रस्तादेखील जोडला आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. या भागातील नागरिक थेट येथून मुख्य सिंहगड रस्त्याला येतात. तसेच वडगाव, नऱ्हे, धायरी  आणि त्यापुढील भागातील ज्या नागरिकांना राजाराम पुलाकडे जायचे आहेत ते देखील या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतील चौक असूनदेखील तेथे वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच या चौकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. झाडांचा आणि दिव्यांचा योग्यप्रकारे उपयोग करून हा परिसर नयनरम्य करणार आहे.
- अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता पथ विभाग

या परिसरातून अंधार पडल्यावर महिलांनी एकट्याने जाणे तसे अवघड होते मात्र आता रस्ता रुंदीकरण झाले आहे. रस्त्याला लागून असलेल्या भिंतीवरील चित्रांमुळे परिसर खुलून गेला आहे. 
- राजश्री जागडे, नागरिक 

पाच वर्षांपूर्वी या भागातून रात्री ये-जा करणे अवघड होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र आता रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने वर्दळ वाढली आहे. त्यामुळे परिसर सुरक्षित वाटत आहे. 
- अश्‍विनी निवंगुणे, नागरिक

Web Title: Development Vishrantinagar Chowk